Pimpri : खालापुरातील शिक्षक निघाला नक्षलवादी

खालापूर : नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ ‘लॅपटॉप’ हा डोणवत गावात (ता. खालापूर) येथे सुनील जगताप या बनावट नावाने राहत असल्याचे उघड झाले आहे.
आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना शिकविण्याचे ढोंग करीत तो स्वतःची खरी ओळख लपवित होता. मात्र पुणे एटीएस युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती मिळवून तीन मे रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, तालुक्यात देवमाणसाच्या रूपात वावरणारा शिक्षक नक्षलवादी असल्याचे समजताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तब्बल १४ गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ ‘लॅपटॉप हा गेल्या सहा ते सात वर्षांपासून खालापूर तालुक्यातील डोणवत गावात एका चाळीत राहिला, त्यानंतर जिल्हा परिषद शाळेसमोरील इमारतीत राहत होता. शिक्षकाच्या वेशात आदिवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी जात असल्याने ग्रामस्थांसाठी तो देवमाणूस होता.
परंतु पुणे एटीएस युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने त्याच्याबद्दल माहिती मिळवून तीन मे रोजी त्याला ताब्यात घेतले. सोमवारी त्याला मुंबई सेशन कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास दहशतवाद विरोधी पथक करीत आहे.





