Pimpri : विनापरवाना श्वान पाळणा-यांवर कारवाई करा

पिंपरी : घरगुती श्वानासाठी महापालिकेकडून परवाने घेणे बंधनकारक असताना शहरातील सुमारे पन्नास ते साठ हजार नागरिक विनापरवाना श्वान पाळत आहेत. श्वानांचे वेळेत लसीकरण केले जात नाही. ही कुत्री चावल्यास रेबीज होऊन नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनापरवाना खुत्री पाळणा-या नागरिकांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी वंचित उत्थान व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन सोनवणे यांनी केली आहे.
यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, विनापरवाना घरे बांधणे तसेच विनापरवाना नळ कनेक्शन जोडणा-या नागरिकांवर फौजदारी कारवाई केली जाते. तोच नियम विनापरवाना कुत्री पाळणाऱ्या नागरिकांना लावण्यात यावा. शहरातील झोपडपट्टी भागात नागरिकांना राहण्यासाठी पुरेशी जागा नाही, तरीही घरात कुत्री पाळली जातात. घरात पुरेशी जागा नसल्याने ती कुत्री रस्त्यांवर सोडली जातात.
अशा कुत्र्यांची योग्य निगा राखली जात नाही. त्यांचे वेळेवर लसीकरण केले जात नाही. हीच परिस्थिती चाळीत व घरकुल तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीत आहे. राहायला जागा कमी असताना तिथे कुत्री पाळली जातात, त्यांच्या गळ्यात पट्टा बांधला जात नाही. घरात जागा नसल्याने त्यांना बाहेर रस्त्यावर मोकळे सोडले जाते.
अशा कुत्र्यांची झुंड तयार होत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. कुत्री चावल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. रेबीज झाल्यास नागरिकांचा जीव देखील जाऊ शकतो. तरी, याची गांभीर्याने दखल घ्यावी, मागणी सोनवणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





