Pimpri : रब्बी पिकाला फाटक्या साडीचा ‘आधार’

नाणे मावळ : रब्बी हंगामातील पिके आता शेतकऱ्यांच्या हाताशी येत आहेत. नाणे मावळ परिसरात रब्बी पिके जोमाने फुलू व डोलू लागली आहेत. मात्र याच दरम्यान पिकांवर जवळपासच्या डोंगरांत असणाऱ्या वन्यप्राण्यांचा हल्ला होत असून पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. यात प्रामुख्याने शेतीला कुंपन घातले जात असून त्यासाठी साड्यांचा वापर केला जात आहे.
नाणे मावळ परिसरात डुकरे आदी वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पिकाच्या नासाडीने शेतकरी हैराण झाला आहे. पिकांच्या बचावासाठी काय करावे? या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला घरातील महिलांच्या जुन्या फाटक्या साडीचा आधार मिळाला आहे. महिलांच्या जुन्या न वापरता येणाऱ्या साड्यांना शेतीभोवती कुंपनासारखे लावून शेतकरी हाताशी आलेल्या पिकाचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे.
असे केले जाते साडीचे कुंपन
साडीचे कुंपन ही पिकाचे संरक्षण करण्याची प्राथमिक व पारंपारिक पद्धत आहे. पिकाच्या सभोवताली खुंटे रोवले जातात. त्या खुंट्याला साडी बांधली जाते. संपूर्ण पिकाभोवती साडीचा फेर धरला जातो. यामुळे रात्रीअपरात्री जेव्हा वन्यप्राणी पिकात शिरू पाहतात, तेव्हा ते साडीवर आदळून अडखळतात. डुकरांसारख्या प्राण्यांसाठी तर हा पर्याय पुरेसा ठरतो. साड्यांवर आदळलेले प्राणी पुन्हा माघारी फिरतात किंवा दिशा बदलतात, त्यामुळे पिकाचे रक्षण होते.
डोंगरपायथ्याशी राहणारे शेतकरी हैराण
नाणे मावळ परिसरातील बहुतांश गावे ही डोंगराच्या कुशीत किंवा जवळपास असणारी आहेत. त्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन ही डोंगराला लागून असते. अशा शेतकऱ्यांसाठी वन्यप्राण्यांचा त्रास रोजचाच आहे. कधी पिकांची नासाडी तर कधी पाळीव प्राण्यांवर हल्ला यामुळे शेतकरी हैराण झालेत. सांबर, रानडुक्कर, ससे यांसह इतर प्राणी हरभरा, जवस, वाटाणा आदी पिकांवर तसेच तुरी, ज्वारी, मका, भुईमुग, ऊस अशा सर्वच पिकांची नासाडी करतात. अशा प्राण्यांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याला मोठी धडपड करावी लागते.





