जाधववाडी : वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ४३ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तसेच यापुढील काळातही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षांसाठी लायसन्स निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र, सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायमस्वरुपी परवाने रद्द करण्यात येऊ शकतात. पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गासह पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक महामार्गावर देखील पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या स्पीड गन आहेत. अतिवेगातील वाहने, सीटबेल्ट न लावणे, मोबाइलवर बोलणे अशा प्रकारे वाहतूक नियम भंग केल्याबद्दल स्पीडगनच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. भरधाव वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, सिग्नल जम्प करणे, ओव्हरलोड किंवा क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करण्याचे प्रकार वाहन चालकांकडून सुरू असतात. पुन्हा-पुन्हा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे लायसन्स निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाते. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या तीन महिन्यांत ४३ वाहनचालकांचे परवाने निलंबित केले. वाहतूक शिस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहनधारकांनी व चालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाते. -राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड आरटीओने निलंबित केलेले परवाने कारवाई : जानेवारी – फेब्रुवारी – मार्च मद्यपान : १ – १ – २ – मोबाइलवर बोलणे – ५ – ३ – ९ इतन नियमभंग – १० – ५ – ७