Pimpri : ‘भांगरवाडी पुलाचे काम मुदतीत सुरू करा’

लोणावळा : नगर परिषद हद्दीतील विकास कामे आणि प्रलंबित कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत गुरूवारी विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील प्रलंबित कामांवरून आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय., भाजपा, मनसे या पक्षांसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
‘लोणावळा शहरातील प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी साहेबांकडे बैठक लावण्यात आली होती. सदर बैठकीत सूचना करून देखील नगरपरिषद प्रशासन दिरंगाई करीत आहे. भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाचे काम १० मार्च पर्यंत सुरु करावे. दिलेल्या मुदतीत हे काम सुरू झाले नाही, तर लोणावळा नगरपरिषदेला टाळे ठोकणार’ असा इशारा आमदार शेळके यांनी यावेळी दिला. बैठकीत इतर अनेक विषयांवर चर्चा करीत कामांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.
खंडाळा येथील नगरपरिषद शाळेच्या विस्तारीकरणासाठी लगतच्या जागा मालकांना तत्काळ उर्वरित पैसे देऊन जागा ताब्यात घ्यावी. यामध्ये कोणतेही राजकारण अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही आमदार शेळकेंनी सांगितले. यावेळी लोणावळा शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी वलवण तलावाच्या विकास आराखड्याची पाहणी करण्यात आली. त्यासाठी सुमारे ८ कोटी रुपये अंदाजित खर्च येणार असून ५० टक्के खर्च नगरपरिषदेने करावा व ५० टक्के खर्च जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन शेळके यांनी दिले.
लोणावळा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू असून उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आरपीआयचे प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी केली असता, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २ कोटी ७८ लक्ष निधीची उपलब्धता करण्याचे आश्वासन शेळकेंनी दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला.
अनधिकृत टपऱ्या हटविण्याची सूचना
लोणावळा शहराच्या सौंदर्याचे भान राखून मागील १० वर्षांपेक्षा जुन्या टपरी धारकांचे होकर्स झोन करून पुनर्वसन करेपर्यंत त्यांना हटविण्यात येऊ नये. परंतु नव्याने टाकलेल्या १० वर्षांच्या आतील टपऱ्यांचे अतिक्रमण १५ दिवसांत हटविण्याबाबतची सूचना आमदार सुनील शेळकेंनी नगरपरिषद प्रशासनाला दिली.





