Pimpri : रखडलेल्या बीआरटी रस्त्याचे काम सुरु

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक गतिमान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर बीआरटी प्रकल्प विकसित केले. त्यापैकी काळेवाडी ते देहू आळंदी बीआरटी रस्त्याचे काम कंपनीच्या जागेचा ताबा न मिळाल्यामुळे रखडले होते. परंतु, आता जागेचा प्रश्न सुटल्यामुळे भूसंपादनासह या मार्गावरील बीआरटी रस्त्याचा रखडलेला भाग विकसित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
हिंजवडी आयटी पार्क येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जलद गतीने कामाच्या ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी महापालिकेने काळेवाडी ते देहू आळंदी मार्गावर बीआरटी विकसित केली. परंतु, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर ते आयुक्त बंगला दरम्यान सुमारे 100 मीटर रस्त्याची जागा ताब्यात न मिळाल्यामुळे १४ वर्ष रस्त्याचे काम रखडले होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील कंपन्यांनी जागेचा ताबा देण्यास नकार दिल्यामुळे महापालिका येथील बीआरटी रस्ता करू शकली नाही.
परंतु, पालिकेच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षी जागेचा ताबा देण्यास संबंधित कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कंपन्यांना एमआयडीसीने अन्य ठिकाणी जागा दिल्यामुळे त्यांचा स्थलांतराचा विषय मार्गी लागला. कंपन्यांचे स्थलांतर करण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर हा जागेचा ताबा महापालिकेकडे अधिकृतरित्या मिळाला. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी नुकतीच कारवाईला सुरुवात केली आहे. जेसीबीच्या साहाय्याने कंपन्यांचे बांधकाम पाडून तेथील जागा मोकळी केली जात आहे. १०० मीटर बीआरटी रस्ता विकसित करण्यासाठी सुमारे शंभर कोटी खर्च अपेक्षित आहे.
प्रवाशांची नाराजीच
काळेवाडी फाटा ते देहू आळंदी बीआरटी रस्त्यावरील हा शंभर मीटरचा रस्ता विकसित केला, तरी या मार्गावरील सार्वजनिक प्रवासी व्यवस्था यशस्वी ठरण्याची शक्यता कमी आहे. कारण, काळेवाडी ते देहू आळंदी रस्त्यावर धावणाऱ्या बसेसची संख्या अगदीच बोटावर मोजण्याएवढी आहे. बीआरटी बस स्थानकामध्ये रात्री अंधार असतो. विद्युत प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे गैरकृत्यास खतपाणी मिळत आहे. त्याचबरोबर बीआरटी मार्गातून खाजगी वाहने जात असल्यामुळे नियमाचे उल्लंघन होत आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. हा शंभर मीटरचा बीआरटी रस्ता विकसित झाल्यानंतर या मार्गावरुन धावणा-या बसला प्रवाशांचा कितपत प्रतिसाद मिळेल, हे लवकरच पहायला मिळणार आहे.





