Pimpri : काही तरतुदी स्वागतार्ह, परंतु लघु उद्योगांना दिलासा नाही

पिंपरी : कृषी, लघु उद्योग, स्टार्टअप, पर्यटन, औषध निर्मिती, अन्न प्रकि्रया उद्योगांसाठी केलेल्या तरतुदींमुळे हा अर्थसंकल्प उद्योगांना चालना देणारा भासत आहे. परंतु काही अपेक्षांची पूर्ती न झाल्याने निराशा झाली असून हा अर्थसंकल्प लघु उद्योगांना दिलासा देणारा नसल्याचे मत पिंपरी-चिंचवड मायक्रो, स्माल इंडस्ट्रीज फेडरेशनच्या सभासद उद्योजकांनी व्यक्त केले आहे.
पिंपरी-चिंचवड मायक्रो, स्माल इंडस्ट्रीज फेडरेशनच्या वतीने अर्थसंकल्पावर विशेष चर्चासत्र आयोजित केले होते. या दरम्यान उद्योजकांनी अर्थसंकल्पाबाबत आपल्या प्रतिकि्या व्यक्त केल्या. फेडरेशनचे अध्यक्ष गोविंद पानसरे, सदस्य दिलीप देशमुख, दिलीप सावंत, शंकर चक्रवर्ती, रमाकांत पोतदार, मनिषा पानसरे, जगदीश वर्मा, मधुकर गायकवाड, नामदेव बच्चे, दीपक कलापुरे यावेळी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असून शहरात सर्व प्रकारचे लहान-मोठे उद्योग आहेत. उद्योजकांना अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा होत्या. त्यापैकी काही अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत.
लुघ उद्योगांसाठी भरीव तरतुदी केलेल्या नाहीत. विना तारण कर्ज योजना तरतूद, मूलभूत सेवा सुविधा तरतूद, स्टार्टअपसाठीची तरतूद स्वागतार्ह आहे. परंतु इंधन जीएसटीच्या कक्षात आणले नाही किंवा त्यावरील अधिभार कमी न केल्याचा फटका बसत आहे. उद्योगांच्या कररचनेत देखील अपेक्षित बदल झाले नाहीत.
इज ऑफ डूइंग बिजनेसची घोषणा केली परंतु अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे उद्योग बाहेरच्या राज्यात जाण्याची शक्यता असते. संरक्षण, रेल्वे यांच्याकडून कामे मिळण्याची लघु उद्योजकांना तरतूद केलेली दिसत नाही. प्राप्तीकर विधेयक स्वतंत्रपणे मांडले जाणार असल्यामुळे स्पष्टीकरण होत नाही. एकंदरीत अर्थसंकल्प लघु उद्योगांसाठी खूप दिलासा देणारा नाही.





