Pimpri : वाहतूक कोंडीत अडकलेली ‘स्मार्ट सिटी’!

पिंपरी : ‘स्मार्ट सिटी’चा तमाशा! हो, तमाशाच म्हणावा लागेल. कारण केंद्र सरकारकडून हजारो कोटींचा निधी मिळवूनसुद्धा पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यावरचा गोंधळ काही थांबायला तयार नाही. रावेत, हिंजवडी, वाकड, चिखली, पिंपरी ते चिंचवड स्टेशन, सगळीकडे एकाच गोष्टीची पुनरावृत्ती… ती म्हणजे वाहतूक कोंडी, कोंडी आणि कोंडी!
घोषणांचा गजर, प्रत्यक्षात ‘डेड सिग्नल’!
स्मार्ट सिटी अंतर्गत मल्टिलेव्हल पार्किंग, स्मार्ट रोड्स, इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीमसारखे गाजावाजा करणारे प्रकल्प केवळ कागदावरच आहेत. प्रत्यक्षात सिग्नल अजूनही मॅन्युअल पद्धतीने चालवले जात आहेत. कोट्यवधींचा निधी गेला कुठे? असा खवळलेल्या नागरिकांचा सवाल आहे.
रस्ते म्हणजे पार्किंगची जागा, फुटपाथ म्हणजे दुकानं!
वाकड, पिंपळे सौदागर, वाकड, काळेवाडी, चिंचवड परिसरात रस्ते संकुचित, अतिक्रमण वाढलेलं, वाहतूक नियंत्रण शून्यावर. चिखली, वडमुखवाडी आणि चऱ्होलीसारख्या भागांमध्ये तर नव्या सोसायट्यांच्या नावाखाली रस्त्यांवरच पार्कंग बसवली आहेत. पार्किंग नाही, बस सुविधा नाही, नियोजन नाही!
स्मार्ट सिटी फक्त बॅनरवर! जमिनीवर? ‘स्मार्ट’ गोंधळच!
महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये प्रत्येक गोष्ट आहे. फलक, अॅप, डेमो, प्रेस नोट्स… पण जे हवे तेच नाही – प्रत्यक्ष अंमलबजावणी. त्यामुळे रोज हजारो नागरिक वेळ, इंधन आणि संयम गमावतात.
‘स्मार्ट’ योजनेवर फक्त खर्च, वापर शून्य!
“अमुक अॅप लाँच केलं”, “तमुक रोड उद्घाटन झालं”, असे बातम्या छापून आल्या. पण नागरिक अजूनही रोजच्या प्रवासात अडकलेले. “ह्या ‘स्मार्ट’ नावाने आम्हाला फसवू नका, कृती दाखवा!” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
कोट्यवधींच्या निधीचं काय केलं?
स्मार्ट सिटीसाठी दोन हजार कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर झाला. पण त्यातून नेमकं काय आणि कुठे झालं याचं उत्तर प्रशासनाकडे नाही. ट्रॅफिक सिग्नल सुधारले नाहीत, रस्ते वाढले नाहीत, पार्किंगची शिस्त नाही, मग निधी गेला कुठे?
घोषणांवर नव्हे, कृतीवरच विश्वास!
पिंपरी चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखली जावी, हे प्रत्येक नागरिकाचं स्वप्न आहे. पण त्यासाठी केवळ आराखडे, अॅप्स आणि फलक पुरेसे नाहीत. ठोस पावलं उचलली गेली नाहीत तर ‘स्मार्ट सिटी’ ही उपाधी केवळ ढोंग आणि दिखावा ठरेल.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका पदपथ मोठे आणि रस्ते छोटे करीत चालली आहे. याचा परिणाम म्हणजे वाहतूक कोंडी होय. अरूंद रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहने पार्क केली जातात. तर पदपथावर दुचाकी वाहने पार्क केली जातात. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीत वाढ होत चालली आहे. वाहतूक कोंडी पाहून हीच का ती स्मार्ट सिटी, असा प्रश्न पडतो.
– स्वप्नील चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते, चिंचवडगाव (सिंगल फाेटो)
महापालिकेला थेट सवाल
– स्मार्ट सिटीसाठी मिळालेल्या दोन हजार कोटींपैकी वाहतूक सुधारण्यासाठी नेमका किती निधी खर्च झाला आणि तो कुठे वापरला?
– इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टीमसाठी राबवलेले उपाय प्रत्यक्षात सिग्नल अजून मॅन्युअल का आहेत?
– मल्टिलेव्हल पार्किंग आणि स्मार्ट रोड्सप्रमाणे घोषित प्रकल्प आजतागायत प्रत्यक्षात का आले नाहीत?
– अतिक्रमण, बेकायदा पार्किंग आणि व्यापाऱ्यांच्या अडथळ्यांवर कारवाईसाठी महापालिकेने कोणती ठोस पावले उचलली आहेत?
– दररोजच्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेचे तातडीचे उपाय काय आहेत?





