Pimpri : आळंदीपासून हाकेच्या अंतरावर कत्तलखाना; विकास आराखड्यात प्रस्ताव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने नुकताच प्रसिद्ध केलेला प्रारूप सुधारित विकास आराखडा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मोशी-डुडुळगाव सीमेवर आळंदीपासून हाकेच्या अंतरावर इंद्रायणी नदीजवळ तब्बल ४ एकर जागेवर कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आल्याने, हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी संप्रदायामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या पवित्र भूमीत अशा प्रस्तावामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेवरच गदा येत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. याबाबत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी आक्षेप घेतला असून हे आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने मोशी येथील सर्वेक्षण क्रमांक ३२५ (स.न. ३२५) च्या जागेवर कत्तलखाना प्रस्तावित केला आहे. विशेष म्हणजे, याच स.न.३२५ मध्ये देहू-आळंदी रस्त्यावरील महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानद्वारा संचलित वेदश्री तपोवनच्या अगदी लगत आरक्षण क्र. ५/२२० अन्वये कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आला आहे.
तसेच कत्तलखान्याला लागूनच आरक्षण क्र. ५/२२१ नुसार सुमारे ४ एकर क्षेत्रावर जनावरांचा दवाखाना देखील प्रस्तावित करण्यात आला आहे. पवित्र नद्या, धार्मिक तीर्थ स्थळे आणि स्थानिक लोकभावना यांचा विचार न करता अशा प्रकारचा प्रस्ताव आणल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वारकरी आणि समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल प्रशासनाने जाहीर माफी मागावी. तसेच, प्रशासनाने हा प्रारूप सुधारित विकास आराखडा तातडीने मागे घेण्याची मागणी सिमा सावळे यांनी केली आहे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सावळे यांनी दिला.





