Pimpri : किवळेतील सांडपाणी थेट पवना नदीत

रावेत : देहूरोड कॅन्टोनमेन्ट बोर्डाच्या विविध भागातील सांडपाण्यावर कॅन्टोनमेन्ट बोर्ड प्रशासनाकडून कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. या भागातील सर्व सांडपाणी ओढे व उघड्या नाल्याद्वारे थेट पवना नदीच्या पाण्यात मिसळत आहे. सांडपाण्यामुळे किवळे गावठाण व सांगवडेकडे जाणाऱ्या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना व किवळे गावठाण भागातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांतून मागणी होत आहे.
पवना नदी प्रदूषणाला मामुर्डी व किवळे-विकासनगर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. त्यामुळे या भागातूनच जलपर्णी देखील पाहायला मिळते. ओढे व नाल्यांतून देहूरोड बाजारपेठ, आंबेडकर नगर, गांधीनगर, राजीव गांधीनगर, शितळानगर नंबर एक व दोन, विकासनगर रस्त्यालगत संकल्पनगरी परिसरातील गृहसंकुले, मामुर्डी तसेच थॉमस कॉलनी भागातील सांडपाणी वाहत थेट नदीपात्रात जाऊन मुख्य प्रवाहात जात आहे.
उपाययोजनांची गरज
प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई व दंड आकारण्याबाबत केंद्र व राज्य शासन स्तरावर तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी व्हायला हवी. यासाठी शासनाने तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी नेमायला हवेत. जेणेकरून आगामी काळातील सांडपाण्याबाबत अगोदरच योग्य नियोजन केल्यास नदी प्रदूषण होणे टाळता येईल, असे मत पर्यावरा प्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत.
पिंपरी चिंचवड शहराला अशुद्ध पाणी पुरवठा
देहूरोड आणि आसपासच्या परिसरातून पवना नदीत सांडपाणी मिसळत आहे. येथून काही अंतरावरच रावेत येथील पवना नदीतून पिंपरी चिंचवडकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याचा उपसा केला जातो. जलशुद्धीकरण प्रकल्पात हेच पाणी शुद्ध करून पिंपरी चिंचवडकरांना पिण्यासाठी दिले जाते.





