पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक विभागात स्वतंत्रपणे अभिलेख विभाग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कागदपत्रे व फाईली गहाळ होणार नाही. आवश्यकता असेल तेव्हा ती कागदपत्रे उपलब्ध होतील. त्यानुसार महापालिकेने नियोजन केले आहे. महापालिकेत अनेक विभाग आहेत. त्या सर्व विभागांची कागदपत्रे व फाईली, रजिस्टर आणि इतर आवश्यक महत्वाची कागदपत्रे महापालिका भवनातील तळमजल्यावरील अभिलेख विभागात ठेवली जातात. काही काळ त्या कागदपत्रांचे जतन केले जाते. डिजीटलायेजन झाल्यानंतर अनावश्यक कागदपत्रे व फाईली नष्ट केल्या जातात. सर्व विभागांच्या कागदपत्रांची संख्या मोठी असते. ती एका ठिकाणच्या अभिलेख विभागात जमा करून ठेवणे किचकट व वेळेखाऊ ठरत आहे. महापालिकेकडून १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमात राबविला जात आहे. त्यात अभिलेख विभागाची तपासणी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाचा स्वतंत्र अभिलेख विभाग तयार करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्रपणे अभिलेख विभाग तयार केल्याने कागदपत्रे सहजपणे उपलब्ध होतील. तसेच, ती गहाळ होण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच, त्यासाठी जागांही कमी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागांचा त्याच विभागात स्वतंत्रपणे अभिलेख विभाग तयार करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्या दृष्टीने पावाले टाकण्यात येत आहेत. – प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिं. चिं. महापालिका