मावळ : वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबर मावळ तालुक्यामध्ये सुविधांची वाणवा प्रकर्षाने जाणवत आहे. त्यात अनधिकृत बेकायदेशीर बांधकामे, भंगार गोदामे यामुळे जीवनमान अस्थिर होत असून नुकतीच वडगाव येथे भंगार गोदामाला लागलेल्या आगीमुळे हे प्रकर्षाने जाणवत आहे. तालुक्यातील औद्योगिक वसाहतींमधून निघालेले लाकडाचे पॅकिंग मटेरियल, केमिकल युक्त ड्रम आदी ज्वलनशील वस्तू नागरी वसाहतीमध्ये असणाऱ्या अनाधिकृत भंगार गोदामांमध्ये, फर्निचरच्या दुकानांमध्ये राजरोसपणे रचून ठेवले जात आहेत. मागील महिन्यापासून उष्णतेचा वाढलेला प्रकोप विद्युत बिघाडामुळे शॉक सर्किटचा वाढलेला धोका तसेच अशास्त्रीय दृष्टिकोनातून रचून ठेवलेले हे अत्यंत ज्वलनशील पदार्थ एका जिवंत आग बॉम्ब सारखे असून यामुळे नागरी आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. महामार्गालगत नागरी वस्तीमध्ये नागरिकांना यामुळे जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग लगत मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत भंगार गोदामे उभारले असून यामध्ये पीएमआरडीए, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत, लोणावळा नगरपालिका हे कारवाई करण्यामध्ये दिरंगाई टाळाटाळ करत असून मोठी घटना घडल्यानंतरच प्रशासनाचे डोके ठिकाणावर येणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. मागील आठवड्यात वडगाव मावळ येथील एका भंगाराच्या गोडाऊनला लागलेली आग इतकी भीषण होती की, आग लागल्यानंतर पुढील दहा मिनिटांच्या आत अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझविण्यासाठी पोहचल्या असताना देखील आग विझविण्यासाठी सुमारे १४ तासांचा अवधी लागला. वडगाव शहरात अशी शेकडो गोडाऊन असून त्यात कोणत्याही प्रकारच्या आग प्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध नाहीत. अनेक गोडाऊन अनधिकृत असून त्यांवर कारवाई केली जात नाही. याबाबत वडगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता, या संदर्भात मी माहिती घेऊन सांगतो असे उत्तर त्यांनी दिले. आर्थिक लागेबंध असल्याचा आरोप महामार्गालगत अनेक बेकायदेशीर गोदामे असून आग लागल्यानंतर त्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होतो. या ठिकाणावरून जाणाऱ्या कंटेनर मध्ये बहुतांश वेळा ज्वलनशील केमिकल्स गॅसेस आदींची वाहतूक केली जाते. यामुळे महामार्ग या वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. या गोदामांमध्ये आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने भंगार व्यवसायाशी सर्वांचे आर्थिक लागेबंध असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गराडे यांनी केला. अनधिकृत गोदामांवर कारवाई कधी? पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी व लगतच्या परिसरामध्ये बुलडोझर चालवत अनाधिकृत गोदामे जमीनदोस्त केली होती. मावळ तालुक्यामध्ये बकालपणा वाढला असून अनियंत्रित बेकायदेशीर वाढ भविष्यासाठी घातक असल्याने मावळामध्ये बुलडोजर कधी चालणार? नागरिकांना मोकळा श्वास कधी घेता येणार? अनधिकृत बांधकामे गोदामे यामुळे शासनाला कर संकलनामध्ये मध्ये मोठा फटका बसतो. असे असताना मावळात अनधिकृत गोदामे बांधकामे यावर कारवाई होणे गरजेचे आहे.