Pimpri : वाळू माफियांकडून राजरोसपणे मुळा नदीची लचकेतोड सुरू

पिंपरी : शहरातून वाहणार्या मुळा नदी पात्रात राजरोसपणे वाळू उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. पिंपळे निलख परिसरातून दिवसा व रात्री जेसीबीच्या सहय्याने अवैध वाळू उपसा केला जातो. याकडे पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदारासह स्थानिक तलाठ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाळू माफियांकडून राजरोसपणे मुळा नदीची लचकेतोड सुरू आहे.
पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या हद्दीमधून वाहत असलेल्या मुळा नदीचे दोन्ही महापालिकेकडून नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या टप्प्यात पिंपळे निलख येथे नदीकाठावर हे काम सुरु केले आहे. मात्र, एकीकडे नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरु असताना त्याच कामाचा फायदा घेत वाळू माफियांनी मुळा नदीतून वाळू तस्करी करण्याची संधी साधली आहे.
पिंपळे निलख येथे मुळा नदी परिसरातून अवैधपणे वाळू उपसा करून रात्रीत ट्रॅकर, हायवाद्वारे त्याची वाहतूक केली जाते. महापालिकेने मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम सुरु केले. मुळा नदीचे पात्र स्वच्छ व सुंदर व्हावे, त्यातून शहराची हवा स्वच्छ राहण्यास मदत होईल, शहर पर्यटनास चालना मिळण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु, हे काम करताना होणारी वृक्षतोड आणि नदी पात्रात माती, मुरुम, दगड टाकण्यावरून नदी सुधार प्रकल्पावरून पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करीत आहे.
नदी पात्रातून वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत आहेत. नदीत ठिकठिकाणी वाळूचे ढिगारे दिसत आहेत. नदी सुधारच्या कामासाठी ठेकेदाराने नदीच्या किनारी मुरूम, माती, दगड टाकून रस्ते तयार केले आहेत. त्याचा फायदा काही वाळू तस्करी करणारे घेत आहेत. मुळा नदीतून रात्रीतून लाखो ब्रास वाळूची चोरी होवून अवैध वाहतूक सुरु आहे. याची पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदारांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार करुनही कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे नदी पात्रातून गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन करुन शासनाच्या महसूलावर पाणी फिरत आहे.
ट्रक, हायवा नेमके कोणाचे?
वाळूचे ढिगारे रात्रीच्या अंधारात ट्रक, हायवा, ट्रॅक्टर भरून इतर ठिकाणी नेले जात आहेत. नदीत वाळू उपसा किंवा वाहतूक करण्यासाठी कोणताही परवानगी महसूल विभागाकडून दिलेली नाही. तसे असताना हा प्रकार शहरात सुरू असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नदी पात्रातून चोरी होणार्या वाळूची सुमारे पाच हजार रुपये ब्रास प्रमाणे विक्री केली जात आहे. स्थानिक आणि परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना ही वाळू बांधकामासाठी पुरविली जात आहे. अशा पद्धतीने अवैध वाळू उपसा करणारे ट्रक, हायवा नेमके कोणाचे आहेत हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हजारो ब्रास मुरुमाचे चलन नसल्याचे उघड
मुळा नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरु असताना नदी पात्रातलगत या ठिकाणी टाकण्यात येत असलेल्या मुरूमाची वाहतूक करणार्या वाहनांकडे गौण खनिज उत्खननाच्या परवानगीचे चलन नाहीत. त्यांच्याकडे उत्खननाचे कोणतेही आदेश अथवा चलनाच्या पावत्या नसल्याचे दिसून आलेले आहे. याबाबत केवळ संबंधितावर २० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.
मुळा नदी पात्रातून वाळू चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार संबंधित स्थानिक महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना सूचना देवून अवैध वाळू उपसा करणार्यावर कडक कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहे.
-जयराज देशमुख, अप्पर तहसिलदार, पिंपरी-चिंचवड





