Pimpri: सोडवून न नेलेल्या वाहनांचा आरटीओ करणार लिलाव

पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओने वाहन कर, पर्यावरण कर वसुली व इतर कार्यवाही अंतर्गत १८९ वाहने जप्त केली आहेत. या वाहनांच्या मालकांनी येत्या ३० दिवसांत आपली वाहने घेऊन जावीत, असे आवाहन आरटीओने केले आहे. दिलेल्या मुदतीत वाहने घेऊन न गेल्यास त्याचा लिलाव केला जाईल, असा इशाराही आरटीओने दिला आहे.
पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाने कार्यालय परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू केले आहे. ज्या नागरिकांनी त्यांच्या वाहनांचा थकीत कर भरला नाही किंवा त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत, अशा नागरिकांची वाहने जप्त करण्यात आली आहेत. आरटीओने ही वाहने आरटीओ कार्यालय, तळेगाव बस डेपो, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, राजगुरुनगर बस डेपो येथे पार्क केली आहेत.
काही वाहनधारकांनी कायदेशीर प्रक्रियेतून आपली वाहने सोडविली आहेत, परंतु अद्यापही 189 वाहन मालकांनी आपली वाहने सोडवून नेलेली नाही. त्यामुळे या वाहनांबाबत आरटीओने स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बराच वेळ उभी असलेली ही वाहने खराब होतात, तसेच त्यांची उपयुक्तता कमी होते आणि त्यामुळे आग लागण्याच्या घटनाही घडतात.
आरटीओ कार्यालयाने जप्त केलेली वाहने पुढील ३० दिवसांच्या आत वाहन मालक, चालक किंवा फायनान्सर यांनी सोडली पाहिजेत. या कालावधीत वाहने सोडविली नाहीत, तर ती दावा न केलेली मानली जातील आणि त्यांचा लिलाव करण्यात येईल.
– राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड





