Pimpri : ज्ञानपीठाचा 701 कोटी रुपयांचा आराखडा तयार

पिंपरी : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या ज्ञानपीठाचा 701 कोटी रुपयांचा आराखडा तयार असून, तो केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्याच्या समारोप आळंदी येथे शनिवारी (दि.10) झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, आमदार बाबाजी काळे, शंकर जगताप, उमा खापरे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएआरडीएचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, अॅड. रोहणी पवार, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.
इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह 39 गावांतील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पूज्यनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणाच्यावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे. जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो. वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ह.भ.प. शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अभिजात भाषेचा दर्जा मिळविताना ज्ञानेश्वरीचे उदाहरण
वारीत स्वयंशिस्त असते, वारी करणाऱ्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो. गीतेतील विचार वारीद्वारे रुजविण्याचा प्रयत्न होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी गितेतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून मांडला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविताना ज्ञानेश्वरी ग्रंथ उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यात आला, असेही फडणवीस म्हणाले. अशा अध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून विचारांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.





