Pimpri : महापालिका निवडणुकीत रिपाइंला सात ते आठ जागा

पिंपरी : महापालिका निवडणूक डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्यात होणार असून महायुती एकत्रित हि निवडणुक लढणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. या पालिका निवडणुकीत रिपाइंसाठी सात ते आठ जागांची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
पिंपरी-काळेवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी परशुराम वाडेकर, चंद्राकांता सोनकांबळे, आण्णा वायदंडे, सूर्यंकांत वाघमारे, प्रा. विजय मोरे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, सुरेश निकाळजे, अजिज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले की, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद मिळणे अपेक्षित होते. मात्र, मंत्रीपद मिळाले नाही. परंतू, अजूनही वेळ गेलेली नाही. आमच्या पक्षाला एक तरी मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. तसेच महामंडळ, विधानपरिषद, जिल्हा, तालुका समित्यांवर रिपाइंच्या पक्षांना कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात पक्षाच्या दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा मिळेल.
महापालिकेने चिखली, कुदळवाडीतील विविध धार्मिकस्थळांना नोटीस बजावली असल्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले, पालिका प्रशासनाने सर्व धर्मीय धार्मिकस्थळांना नोटीस दिल्या आहेत. मात्र, जी धार्मिकस्थळे जुनी आहेत, त्यांच्याकडे पुरावे असतील तर अशा धार्मिकस्थळांना महापालिकेने संरक्षण दिले पाहिजे. परतुं, विकासकामात व रस्त्यात येणाऱ्या धार्मिकस्थळांबाबत लोकांनी महापालिकेला सहकार्य केले पाहिजे. अशा धार्मिकस्थळांना महापालिकेने दुसरीकडे जागा उपलब्ध करुन दिली पाहिजे.





