Pimpri : रस्ते म्हणजे प्रदेशाच्या प्रगतीचा मार्ग – आ. थोरवे

कर्जत : छोटे वेणगाव (ता. कर्जत) येथे आठ कोटींच्या रस्ते सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘रस्ते म्हणजे प्रगतीचा मार्ग. या विचारांचा आधार घेत कर्जत तालुक्यातील रस्ते विकासासाठी नवा अध्याय सुरू केला आहे,’ असे आमदार थोरवे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्जत-खालापूर मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या प्रकल्पाअंतर्गत (राज्य मार्ग ७६) उक्रुळ, चांधई, कडाव, तांबस, दहिवली, खांडपे, कोंदिवडे, चोची, मुगपे, मोहिली, आवळस, पळसदरी स्टेशन ते राष्ट्रीय मार्ग ५४८ अ (राज्य मार्ग ४८५) या रस्त्याची सुधारणा होणार आहे.
यामुळे दळणवळण अधिक सुलभ होईल, व्यापाराला चालना मिळेल व ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल. त्याचप्रमाणे शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रोजगारनिर्मिती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये विकास शक्य असल्याचे थोरवे यांनी सांगितले.





