Pimpri : देहूरोड बाजारपेठेतील रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा

देहूरोड : देहूरोड मुख्य बाजारपेठेतील भाजी मंडई लगत रस्त्यांवरच पथारीवाले, हातगाड्यांनी केलेल्या अतिक्रमणाने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे जिकरीचे झाले असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने भाजी मंडई गाळेधारक संतप्त झाले आहेत.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये स्वतंत्र भाजी मंडई असूनही उड्डाणपूल, मुख्य बाजारपेठ आणि अंतर्गत रस्त्यांवर पथारीवाल्यांसह हातगाड्यांचे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे पादचारांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
लष्कर हद्द असणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रहिवासी भागामध्ये नुकतेच रोहिंग्या आढळून आले आहेत. या अतिक्रमणधारकांची कोणतेही ओळखपत्रांची तपासणी न करता अथवा बोर्ड व पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता प्रतीदिन वाढणाऱ्या अतिक्रमणाने या भागातील सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भाजी मंडईतील गाळेधारक प्रति महिना दीड हजार रुपये बोर्ड प्रशासनाला भाडे देतात. या अतिक्रमणधारकांची वारंवार लिखित तक्रार करूनही बोर्ड प्रशासन याची दखल घेत नाही. त्यामुळे शेवटी संतप्त गाळेधारक भाजी मंडई बंद करून रस्त्यांवर उतरणार असल्याची माहिती मंडईचे अध्यक्ष तुकाराम कनेर यांनी दिली आहे.





