Pimpri : खासदार निधीतून एका मिनिटात रस्त्याला मंजुरी देता येते

पिंपरी : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील भोर येथील बनेश्वरच्या सहाशे मीटर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण केले. त्यावरुन सुप्रिया सुळे यांना पाच कोटींचा खासदार निधी मिळतो. खासदार निधीतून एका मिनिटात रस्त्याला मंजुरी देता येते, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (दि.९) पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले, भोरमधील बानेश्वरचा रास्ता केवळ सहाशे मीटर आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी बानेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न मांडला होता. मी इथला पालकमंत्री आहे. रास्ता सहाशे मीटरचा आहे. फार मोठा नाही. मांडेकर यांचा तो मतदारसंघ आहे. हा रस्ता पीएमआरडीए, जिल्हा परिषद किंवा, जिल्हा वार्षिकी योजने मधून आपण करू, असे सांगितले. तो रस्ता मी करणार आहे, असंही ते म्हणाले.
अमिरेकेने देशात येणाऱ्या निर्यात मालावर कर लावला आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा फटका विविध देशांसह भारताला बसणार आहे. शेअर बाजार गडगडला आहे. भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारल्याने अशा परिस्थितीत देश तावून-सुलाखून निघाला आहे. तसेच, इ-व्हेईकलचा निर्णय घेतला. त्याला परदेशी गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद आहे. कोणत्या गोष्टीला परवानगी दिल्यानंतर रोजगार निर्माण होईल. यासाठी धोरण तयार केले जात असून लवकरच जाहीर होईल. तसेच, राज्यातील धरणातील पाण्यात घट होत आहे. याकडे सरकारचे लक्ष आहे. सद्यस्थितीत धरणातील पाणी पावसाळ्यापर्यंत पुरेल यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे अजित पवार म्हणाले.
वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पुणे मेट्रो निगडीवरुन वाकड आणि चाकण पर्यंत नेण्यात येणार आहे. रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिंगरोडचे कामे सुरू आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही रिंगरोडचे काम हाती घेतले जाणार आहे. ज्यांच्या जमिनी जातात, त्यांना मोबदला दिला जाणार आहे, असे पवारांनी सांगितलं.
मंगेशकर रुग्णालयप्रकरणी चौकशीनंतर कारवाई
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिला. कधीकधी आरोप झाल्यानंतरही राजीनामा द्यावा लागतो पण चौकशीनंतरच त्यावर कारवाई होईल, असं सांगत अजित पवार यांनी घैसास यांच्या प्रश्नावर बगल दिली.





