हिंजवडी : यंदा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच उन्हाळा जाणवू लागला. तर मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. त्यामुळे कूलर विक्री लवकर म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच सुरू झाली. प्रत्येकाला एसी घेणे परवडत नसल्याने बाजारात कूलरला मोठी मागणी आहे. मात्र, यंदा सर्वच प्रकारच्या कुलरच्या दरांमध्ये १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शहरातील पिंपरी मार्केट येथे स्वस्त दरातील डेझर्ट कूलरही यंदा महागले आहेत. मोटर, अँगल आणि मजुरीच्या दरात वाढ झाल्याने किमतीतही वाढ झाली आहे. ब्रॅण्डेड कूलरचे दर ऐकून तर सर्वसामान्यांना घामच फुटत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या डेझर्ट लोखंडी कूलर २ हजारांपासून साडेसात हजार रुपयांपर्यंत, तर फायबर कूलर अडीच हजारांपासून नऊ हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत. ब्रॅण्डेड कूलरची किंमत लिटरनुसार आठ ते २० हजारापर्यंत आहे. पिंपरी मार्केटमध्ये कूलर विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात येथे मोठ्या प्रमाणात विक्री होते. दोन फूट ते चार फूटपर्यंत विविध कूलर उपलब्ध आहेत. कूलरमध्ये फायबर आणि लोखंडी असे दोन प्रकार आहेत, यातील तीन फूट लोखंडी बॉडी असलेल्या कूलरला बाजारात अधिक मागणी असून या सर्वच दुकानांत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे
यावर्षी कूलरच्या मोटरींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. आवक कमी झाल्यामुळे मोटरच्या दरात वाढ झाली. त्यामुळे कूलरचे दर वाढले आहेत. सुरक्षित समजल्या जाणार्या फायबर कूलरमुळे लोखंडी कूलरची मागणी काहीशी कमी झाली आहे. मात्र एप्रिलमध्ये कूलरची मागणी आणखी वाढेल.
– देवीदास मोरे, कूलर विक्रेतेलोखंडी कूलर तयार करताना अँगलसाठी लागणारा खर्च पूर्वी ७८० रुपये प्रति किलो होता, तो आता ८६० रुपये किलोपर्यंत वाढला. मजुरी ११० वरून २८० रुपये झाली. मोटरच्या दरातही वाढ झाल्यामुळे कूलरच्या किमतीत वाढ झाली. पूर्वी पिंपरी मार्केट भागात कुलर विक्रीची मोजकीच दुकाने होती, आता त्यांची संख्या वाढली आहे.
– मानव बनसोडे, कूलर होलसेल विक्रेते
डेझर्ट (लोखंडी) कूलरचे सध्याचे दर (हजार रुपयांत)
■ दोन फूट २ हजार
■ तीन फूट ३,५००
■ चार फूट ७,५००
फायबर कूलरचे सध्याचे दर (हजार रुपयांत)
■ २५ लिटर २,५००
■ ४० लिटर ३,५००
■ ६० लिटर ६,५००
■ ९० लिटर ८,५००
■ १५० (टेंट कूलर) ९,०००