Pimpri : सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात भात बियाणे

हिंजवडी : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व मुळशी अग्रो पॅक्स प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना इंद्रायणी भाताचे बी-बियाणे ना नफा-ना तोटा या तत्त्वावर विक्रीस दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आनंदा घोगरे, बँकेचे विभागीय अधिकारी सुरेश नागरे, विविध गावचे विकास सोसायटीचे चेअरमन, संचालक, सचिव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचा शुभारंभ बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या शुभहस्ते गुरुवारी (दि. २२) करण्यात आला. यावेळी बोलताना चांदेरे म्हणाले की, मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्यासाठी बँकेच्या मार्फत हा उपक्रम सुरू केला आहे. सेंद्रीय भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे बियाणे खरेदी करावे.
बियाणांची बॅग ३० किलो वजनाची असेल. बॅगेची किंमत ना नफा-ना तोटा या तत्वावर ७०/- रु प्रतिकिलो प्रमाणे असेल. जे शेतकरी या सेंद्रीय बियाणांचा वापर करून सेंद्रीय इंद्रायणी भाताचे उत्पादन घेतील त्यांच्या भाताला ४०/- रु प्रतिकिलोप्रमाणे दर मिळेल. अशी ग्वाही त्यांनी दिली. सेंद्रीय खतांचा वापर करून विषमुक्त शेतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही चांदेरे यांनी केले.
येथे मिळेल बियाणे
सुरुवातीला हे बियाणे पीडीसीसी बँक, पौड येथील केंद्रावर विक्रीस उपलब्ध आहे. जे शेतकरी सेंद्रीय बियाणे खरेदी करू इच्छित आहेत त्यांनी आपल्या गावाच्या वि.का.सोसा सचिवांकडे लवकरात लवकर आपल्या नावाची नोंदणी करावी.असे आवाहन भात बियाणे खरेदी अधिकारी बाबासाहेब दत्तात्रय ववले यांनी केले.





