Pimpri : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत विकासकामांचा आढावा

तळेगाव दाभाडे : शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात ३० एप्रिल २०२५ रोजी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मुख्याधिकारी विजय सरनाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार उपस्थित होते.
बैठकीत शहरातील अंतर्गत रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि ३० मे २०२५ पर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश आमदार शेळके यांनी दिले. कचरा व्यवस्थापन, नालेसफाई, अग्निशमन यंत्रणा आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठा विभागाला नियमशीर व शिस्तबद्ध काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहरात ६ ठिकाणी नवीन बसथांबे आणि जिजामाता चौक, स्टेशन चौक व मच्छी मार्केटजवळ चार युनिटचे सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपरिषदेच्या मोकळ्या जागा व सोसायट्यांच्या ओपन स्पेसमध्ये सौंदर्यीकरण, तळ्यापासून स्मशानभूमीपर्यंत ओढ्याची स्वच्छता, फुटपाथ, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम आणि बाकड्यांची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले.
वाढत्या व्यसनाधीन मुलांच्या समस्येवर अंमली पदार्थविरोधी कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला तत्काळ लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा आणि विद्युत विभागांनी दुरुस्तीची कामे पूर्ण करून नागरिकांच्या गैरसोयी टाळाव्यात, असे आदेश देण्यात आले. नागरिकांच्या प्रशासकीय तक्रारींची दखल घेऊन संबंधितांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.





