Pimpri : श्री संत तुकाराम कारखान्यात सर्वपक्षीय पॅनलचा दणदणीत विजय

हिंजवडी : कासरसाईतील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळविला.
नवले यांच्या हिंजवडी ताथवडे गटातूनच कासरसाईचे माजी सरपंच बाळासाहेब भिंताडे यांनी माघार न घेतल्याने एका जागेसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये भिंताडे यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.त्यांचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे नेते विदुरा नवले यांच्यासह दत्तात्रय गोपाळ जाधव व चेतन हुशार भुजबळ यांच्याशी झाला . यामध्ये नानासाहेब नवले यांना (8524) मते, दत्तात्रय जाधव (8380) मते, चेतन भुजबळ यांना (7189) मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब भिंताडे यांना केवळ 2505 मते मिळाली.
2025 ते 2030 कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शनिवारी ( दि. ५) पाचही तालुक्यातील 57 मतदान केंद्रावर एकूण मतदान 9515 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 112 मते बाद झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकूंद पवार यांनी घोषित केले. प्रत्येक उमेदवाराला पडलेली अंतिम मते व निकाल त्यांनी घोषित केला.
तत्पूर्वी रविवारी ( दि. ६ ) सकाळी 9 वाजल्यापासून वाकड येथील द्रौपदा मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली होती. सुरवातीला मुळशी तालुक्यातील मतपेट्या मोजण्यात आल्या. मुळशीच्या पहिल्या फेरीतच भिंताडे पिछाडीवर पडल्याने त्यांना पडद्याआड साथ देणाऱ्या अनेक नेतेमंडळींनी काढता पाय घेतला. नवले यांच्या पॅनेलने घेतलेली आघाडी मावळ तालुक्यातही कायम राहिली. तर खेड हवेली शिरूर तालुक्यातील मरकळ गटात सर्वपक्षीय पॅनलला संचालक अनिल लोखंडे यांनी भरीव आघाडी मिळवून दिली. अखेर तिसऱ्या राऊंड नंतर विजयी व प्रत्येक गटातून बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांच्या नावांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी जाहीर केली.
यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सर्जेराव कांदळकर ,सचिन सरसमकर, बाळकृष्ण घुगे, उमेश थिटे, संगीता चौधरी, मंदार कुलकर्णी, सुनंदा शिंदे सचिन भिडे व कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक साहेबराव पठारे यांनी काम पाहिले.





