Pimpri : लोकप्रतिनिधींनो….बॅनरबाजी करताना भान ठेवा

पिंपरी : नेत्यांचे वाढदिवस तसेच महापुरुषांच्या जंयतीनिमित्त शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनरबाजी करण्यात आली. शहरातील चौका-चौकांत उभारलेल्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होऊऩ वाहतुकीस अडथळा तयार झाला. याबाबत कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला दमदाटी करणे, शिवीगाळ व मारहाण करणे अशा घटना घडल्याने महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील पाच आमदार आणि एका खासदाराला नोटीस देत अनधिकृत फलक उभारणार्या कार्यकर्त्यांना समज देण्याची सूचना केली आहे.
नुकताच चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर फलक उभारण्यात आले. त्यामध्ये कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अधिकृत होर्डिंगवर फलक न लावता शहरात जागा मिळेल तिथे अनधिकृत फलक उभारले. तसेच मागच्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पार पडली. या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने प्रबोधन पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देखील राजकीय कार्यकर्ते व काही संस्थांनी शहरभर अनधिकृत फलक लावले. पिंपरी चौकामध्ये तर सर्व नियम धाब्यावर बसवत फलक उभारण्यात आले. त्याचा अडथळा वाहतुकीला झाला असून शहराचे विद्रुपीकरण झाले. शहरात उभारलेल्या अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाचे पथक गेले असता त्यांना दमदाटी करणे तसेच धमकावण्याच्या घटना घडल्या. याची गंभीर दखल घेत महापालिकेने शहरातील पाच आमदार आणि एका खासदाराला नोटीस दिली आहे.
त्यानुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरात विशेष मोहीम राबवून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली आहे. त्याचा अहवाल उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे. असे असताना शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलक लावले जात आहे. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, किऑक्स याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावेळी शहरातील लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ज्या बॅनरवर माझा फोटो असेल त्यावर सर्वप्रथम कारवाई करण्याचे आदेश दिले. जेणेकरून समाजामध्ये चांगला संदेश जाईल. असे असतानाही शहरात अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बिनधिक्कतपणे अनधिकृत होर्डिंग, बॅनर लावत आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी पथक गेले असता वाद घालणे, विरोध करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी यांचे वाढदिवस, महापुरुषांची जंयती तथा पुण्यतिथी तसेच विविध सण उत्सवांच्या कालावधीमध्ये जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास महापालिकेच्या अधिकृत होर्डिंग्जचा वापर करावा. त्याबाबत आपल्या कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात. शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत फलक, होर्डिंग, किऑक्स न लावण्याबाबत समज द्यावी. लोकप्रतिनिधी या नात्याने शहराचे विद्रुपीकरण थांबवून शहराच्या सौंदर्यात भर घालण्यास प्रशासनाला सहकार्य करावे अशा सूचना नोटीसीद्वारे देण्यात आल्या आहेत.
१४ जणांच्या विरोधात गुन्हा
आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने शहरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येत आहे. ऑक्टोबर २०२४ पासून आजपर्यंत १३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यांना दिली नोटीस
खासदार श्रीरंग बारणे (मावळ लोकसभा), आमदार शंकर जगताप (चिंचवड), महेश लांडगे (भोसरी), विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे (पिंपरी), विधानपरिषदेचे आमदार उमा खापरे, अमित गोरखे.
नेत्यांचे वाढदिवस, महापुरुषांची जंयती तथा पुण्यतिथीला शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलक लावले जातात. यामुळे शहराचे विद्रपीकरण होत असून महापालिकेचा महसूल देखील बुडतो. अनधिकृत होर्डिंग व बॅनरबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील याला आळा घालण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अनेक पक्षाचे कार्यकर्ते अनधिकृत फलक उभारतात. त्यांना समज देण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींना पत्राद्वारे कळवले आहे.
– प्रदीप ठेंगल, सहायक आयुक्त, आकाश चिन्ह व परवाना विभाग.





