Pimpri : १५ वर्षावरील वाहनांच्या पुर्ननोंदणी शुल्कात दुप्पटीने वाढ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद असलेल्या एकूण वाहनांची संख्या सुमारे २४ लाख आहे. यात १५ वर्षावरील वाहनांची संख्या ही सुमारे ५ लाख इतकी आहे. रस्ते व परिवहन मंत्रालयाने १५ वर्षावरील वाहनांसाठी पुर्ननोंदणी शुल्कात मोठी वाढ केली आहे. त्यात नोंदणी शुल्कात आताच्या तुलनेत दुप्पट वाढ केली असल्याने जुने वाहन चालविणे अनेकांना महागात पडू शकते.
वर्षाला दोन लाख नव्या वाहनांची भर पडणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात जुन्या वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. सद्यःस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे पाच लाख वाहनांच्या आयुर्मान १५ वर्षापेक्षा अधिक आहे. वाहनांची संख्या लक्षात घेता निर्लेखित केंद्रांच्या (स्क्रैप सेंटर) संख्येतही वाढ केली जात आहे. सद्य स्थितीत ३ केंद्र असून, लवकरच एका नव्या केंद्राला मंजुरी मिळणार आहे.
रस्ते व परिवहन मंत्रालयाने १५ वर्षावरील वाहनांसाठी पुर्ननोंदणी शुल्कात मोठी वाढ केली आहे. नुकतेच त्या संबंधीचा सूचना पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे जुने वाहन चालविणे आता अनेकांना परवडणार नाही. त्यामुळे जुनी वाहने भंगारात काढणे अथवा जास्तीचा कर भरणे हे दोन पर्याय वाहनधारकांकडे उपलब्ध असणार आहेत.
नवीन वाहन खरेदीत १० टक्के सवलत
१५ वर्षांवरील वाहने नोंदणीकृत केंद्रात भंगारात दिल्यावर वाहन मालकांना चांगला मोबदला मिळेल. शिवाय त्यांना एक प्रमाणपत्र देखील दिले जाते.नवीन वाहन खरेदी करताना ते प्रमाणपत्र वाहन विक्रेत्याला दाखविल्यास सरकारकडून वाहनांच्या किमतीवर १० टक्के सवलत दिली जात आहे. जुन्या वाहनांच्या बदल्यात चांगली रक्कम व नवीन वाहन घेताना आर्थिक सवलत असा दुहेरी फायदा वाहनधारकांचा होणार आहे.
दोनशे वाहने होणार निर्लेखित
स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर परिवहनमंत्र्यांनी १५ एप्रिलपर्यंत आयुर्मान संपलेली वाहने निर्लेखित करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवड आरटीओने २०० वाहनांचे निर्लेखित करण्याचे ठरविले आहे. यात ६० रिक्षा असून, चारचाकी व दुचाकी स्वरूपाची वाहने आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील वाहनांची संख्या लक्षात घेता, स्क्रैप सेंटरमध्ये वाढ केली जात आहे. वाहनधारकांनी १५ वर्षांवरील वाहने स्क्रैप केल्यास त्यांना आर्थिक सवलत दिली जात आहे.
– संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवडऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी झालेल्या आकडेवारीनुसार अंदाजे ५ लाख वाहनांचे आयुर्मान संपले आहे. तसेच कारवाईत जप्त केलेल्या वाहनांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.
– राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड आरटीओ





