Pimpri : रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी आंचल दलाल

खालापूर : रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची प्रशासकीय बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आंचल दलाल या पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. बदलीनंतर सोमनाथ घार्गे हे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जायचे.
त्यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर मोठा भर दिला. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस ठाणे बनविण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. पोलिसांना अत्याधुनिक वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न केले.
पोलीस प्रशासनाला लोकाभिमूख करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्यकाळात सिसीटीएनएस प्रणालीत रायगड पोलिसांच्या कामगिरी सातत्याने अव्वल राहिली.
दरम्यान नव्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल या पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक म्हणून कार्यरत होत्या. रायगड पोलीस दलाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत.





