Pimpri : मृत्यूनंतरही फरफट… स्मशानभूमीविना कातवी गाव !

वडगाव मावळ: ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ सह ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करीत असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील कातवी गाव अद्यापही स्मशानभूमीसारख्या मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत. एकीकडे वडगाव शहरात विस्तीर्ण व सर्व सोयी-सुविधा युक्त अशी स्मशानभूमी असताना, नगरपंचायतीचाच भाग असलेल्या कातवी गावातील नागरिकांना मात्र मृतदेहावर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. एकाच छताखालील दोन गावांत असलेल्या या टोकाच्या विरोधाभासानंतर कातवी ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावात स्मशानभूमी लवकर बांधावी, अशी आग्रही मागणी केली आहे.
कातवी हे गाव पूर्वी वडगाव-कातवी ग्रामपंचायतीमध्ये होते. पाच वर्षांपूर्वी वडगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर वडगाव नगरपंचायतीत झाले, सोबत कातवी गावही जोडले गेले. कातवी गावची लोकसंख्या १ हजार ते १२०० इतकी असून गावाला स्मशानभूमी नसल्याने गावात कुणी मृत्यू पावल्यास सदर मृतदेहावर इंद्रायणी नदीजवळ उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. तर पावसाळ्यात मृतदेहावर अग्नी संस्कार करणे खूप अडचणीचे होते.
वडगाव ग्रामपंचायतीत कातवी गाव असल्यापासून गावकऱ्यांची स्मशानभूमीची मागणी आहे. परंतु गावकऱ्यांच्या या मागणीचा संवेदनशीलपणे विचार न करता त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप कातवीकर करीत आहेत. येत्या काळात स्मशानभूमी न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल, असे काही ग्रामस्थांनी सांगितले.
कातवी गावासाठी स्मशानभूमी करावी अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विजय राऊत यांनी दिला असून कातवी गावात लवकर स्मशानभूमी बांधावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, स्मशानभूमीसाठी गायरानातील जागा मंजूर झाली होती. त्याठिकाणी मालकीच्या जागेत काही नागरिकांची घरे आहेत. तिथे नागरिकांना स्मशानभूमी सोयीस्कर वाटत नाही, असे स्थानिक वैभव पिंपळे यांनी सांगितले. तर, गावाजवळून इंद्रायणी नदी वाहते. नदीच्या पात्राजवळ जागा आहे, तिथे ग्रामस्थांच्या दृष्टीने स्मशानभूमी असणे सोयीस्कर वाटते, असे माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण यांनी सांगितले.
सन २०२३-२४ च्या विकास आराखड्यामध्ये कातवी गावच्या स्मशानभूमीकरिता जागा आरक्षित केलेली आहे. लवकरच त्यासाठी भूसंपादन करून स्मशानभूमी करण्यात येईल.
– डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत
सन २०२२-२३ मध्ये कातवी गावच्या स्मशानभूमीचे काम मंजूर झाले आहे. त्याबाबत निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र ग्रामस्थांच्या काही हरकतीमुळे ते काम स्थगित झाले आहे.
– दिनेश ढोरे, माजी नगरसेवक, वडगाव नगरपंचायत
कातवी गावात इंद्रायणी नदीकाठी पूर्वीपासून अंत्यसंस्कार होत आहे. इतरत्र माळरानावर स्मशानभूमी होण्यापेक्षा नदी शेजारी स्मशानभूमी व्हावी, अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.
– शंतनु घुले, अध्यक्ष, पुणे जिल्हा मानवाधिकार संघटना





