Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

पिंपळे गुरव : सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होणार्या वीज पुरवठा खंडिततेमुळे गंभीर प्रकारची अडचण निर्माण झाली असून, रुग्णांवर होणार्या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. तपासण्या, शस्त्रक्रिया, डायलेसिससारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा यामुळे खोळंबत असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मागील आठवड्यापासून दर दोन दिवसांनी रुग्णालयाचा 5 ते 7 तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे रुग्णालयाच्या अंतर्गत कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत असून, अनेक वेळा वीज न आल्यामुळे तपासण्या रद्द कराव्या लागत आहेत. विशेषतः अतिदक्षता विभागात दाखल 40 ते 50 गंभीर रुग्ण, व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण आणि दररोज डायलेसिस घेणारे रुग्ण यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या 200 ते 250 आंतररुग्ण आहेत. शस्त्रक्रिया गृहात नियमितपणे ऑपरेशन्स होतात. मात्र वीज नसल्याने अनेक वेळा यामध्ये अडथळे येत आहेत. रुग्णालयात जनरेटरची व्यवस्था असली तरीही मर्यादित कालावधीसाठीच चालू ठेवता येते. त्यामुळे दीर्घकाळासाठी वीज नसल्यास रुग्णालयाची व्यवस्था कोलमडते.
विशेष बाब म्हणजे, हा वीज पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित केला जात असल्याने रुग्णालय प्रशासनाला तयारी करता येत नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अंधारात तपासण्या करून घ्यायला, उपचार घ्यायला आणि इतर सोयींचा उपयोग करायला विवश होतात. अंधारातच काही रुग्ण तपासणी कक्षात येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने महावितरणकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप यावर ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी आणि वैद्यकीय कर्मचार्यांनी केली आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य संजय मराठे म्हणाले रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी वीज ही मूलभूत गरज आहे. अशा ठिकाणी वीज खंडित होणे म्हणजे केवळ असुविधा नव्हे तर अनेकांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. म्हणूनच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीज खंडित करण्यापूर्वी याची पूर्वसूचना देणे, तसेच आवश्यक तांत्रिक दुरुस्ती तातडीने पूर्ण करणे, हाच योग्य मार्ग ठरेल.
महावितरणच्या वतीने वारंवार लाईटचा पुरवठा खंडित होतो. त्यावेळी अडचण निर्माण होते. जनरेटरची सुविधा आहे, मात्र त्याच्या वापरावर बंधने येतात त्यामुळे वीज पुरवठा सतत अखंडित ठेवण्यात यावा.
– डॉ. नागनाथ येम्पल्ले,
जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा रुग्णालयाने राज्य शासनाकडे तशी मागणी केल्यास स्वतंत्र एक्सप्रेस फिडर टाकता येईल. जेणे करून येथील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळेल.
-कल्याण गिरी, कार्यकारी अभियंता





