Pimpri : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या नियोजना दरम्यान पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

पिंपरी : तळवडे वाहतूक विभागात कार्यरत असलेले सहायक पोलीस फौजदार किसन नामदेव वडेकर (वय ५५) यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. बालेवाडी येथे बंदोबस्ताबाबत शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) ब्रिफींग सुरु असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
किसन वडेकर हे तळवडे वाहतूक विभागात पोलीस निरीक्षक यांचे रीडर म्हणून काम पाहत होते. शनिवारी (दि. २२) बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे.
वाहतूक नियोजनासाठी शुक्रवारी सकाळी बालेवाडी स्टेडियम येथे ब्रिफींग सुरु होते. त्याच वेळी अचानक वडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
किसन वडेकर हे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत होते. त्यांनी चिखली, निगडी पोलीस ठाण्यात काम केले. त्यांची मागील काही महिन्यांपूर्वी तळवडे वाहतूक विभागात बदली झाली होती. अतिशय मनमिळावू, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख होती. त्यांच्या निधनाने शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.





