पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री – 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमातंर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत तिसरे स्थान मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंगळवारी (दि.20) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा गौरव केला. मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सैनिक, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खरगे, अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग असीमकुमार गुप्ता यांच्यासह प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री – 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा अंतिम निकाल 16 मे 2025 रोजी जाहीर झाला. यात गुणवत्ता परिषद भारत (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया टउख) यांनी केलेल्या अंतिम मूल्यांकनात पीएमआरडीएने 76.02 गुण मिळवत राज्यभरातील 95 महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय / निमशासकीय संस्था, कंपन्या आदी गटातून तिसरा क्रमांक मिळवला आहे. मुख्यमंत्री – 100 दिवसाच्या कार्यक्रमात माझ्या सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी घेतलेल्या सामुहिक मेहनतीमुळे पीएमआरडीएला हा पुरस्कार मिळाला. नागरिक केंद्रीत कार्यालयीन सोयी सुविधा आणि लोकाभिमुख प्रशासनावर आमचा अधिक भर आहे. याची राज्य शासनाने दखल घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. – डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त,पीएमआरडीए — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. योगेश म्हसे यांचा सत्कार केला.