Pimpri : अंत्यविधीनंतर रक्षा विसर्जित न करता वृक्ष लागवड

तळेगाव दाभाडे : नदीतील पाण्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी मावळ तालुक्यातील परंदवडी गावातील ग्रामस्थ नदीतीरी मृत व्यक्तीचे दहन केल्यानंतर त्याची रक्षा (राख) ही नदीच्या पाण्यात विसर्जित न करता वृक्षारोपण करून रक्षा (राख) त्या झाडाच्या रोपणासाठी खोदलेल्या खड्यामध्ये टाकतात. याद्वारे मृत व्यक्तीच्या राखेतून वृक्षसंवर्धन करून त्याची आठवण कायमस्वरुपी जपता येते. परंदवडी ग्रामस्थांच्या या पर्यावरणपूरक व स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नुकतेच येथील पैलवान आनंदा राघू भोते यांचे निधन झाले. भोते यांच्या निधनामुळे परिवाराला दुःख झाले असताना देखील गावाची रीत म्हणून याठिकाणी रक्षा विसर्जित न करता वृक्ष लागवड करण्यात आली. जेसीबी आणून गावकरी प्रथेप्रमाणे एक मोठा खड्डा घेतात. त्यामध्ये आंबा, वड, पिंपळ, चिंच आदी देशी झाडापैकी एक दहा फूट उंचीचे झाडाचे रोपण करतात. त्यामध्ये माती न टाकता मृत व्यक्तीच्या दहन विधीनंतर निर्माण झालेली रक्षा (राख) टाकून त्या मृतात्म्याच्या नावे आठवण म्हणून एक झाड लावले जाते.
एकीकडे नदीचे होणारे प्रदूषण हा राष्ट्रीय मुद्दा बनलेला असताना, पवना – इंद्रायणी नदी या दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत असताना नदी स्वच्छतेसाठी परंदवडी ग्रामस्थांनी टाकलेले हे एक पाऊल निश्चित कौतुकास्पद आहे. परंदवडीच्या ग्रामस्थांचा लहानसा उपक्रम सर्व ठिकाणी स्वीकारला जाणार का, हे पाहावे लागेल.
सहा वर्षांपासून राबविला जातोय उपक्रम
गेली ५ ते ६ वर्षापासून वृक्षारोपणाचा हा पर्यावरणपूरक कार्यक्रम दुःखद घटनेनंतरही ग्रामस्थ एकत्र येऊन सामुदायिकपणे करीत आहेत. आतापर्यंत सुमारे २५ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे उंच झालेल्या झाडांच्या सावलीमध्ये अंत्यविधीस आलेले नागरिक बसत आहेत. नदी प्रदूषण होऊ नये म्हणून अंत्यविधीनंतर निर्माण होणारी राख ही वृक्षारोपण करून त्या वृक्षाभोवती टाकली जाते, एवढी काळजी ग्रामस्थ घेत आहेत.
नदी स्वच्छतेसाठी व्यापक प्रयत्नांची गरज
एकीकडे नदी स्वच्छतेसाठी दुःखद प्रसंगानंतरही परंदवडी ग्रामस्थ हा स्तुत्य उपक्रम राबवित असताना, दुसरीकडे नदीच्या उगमापासून होणारे नदीचे प्रदूषण काही केल्या कमी होताना दिसत नाही. नदीच्या तीरावर वसलेल्या गावातील मोठमोठ्या बांधकामांच्या ठिकाणचे सांडपाणी, कंपन्यांमधील रासायनिक द्रव व सांडपाणी, नदीतीरावरील गावातील सांडपाणी हे सर्व नदीत मिसळून नदी प्रदूषित होत आहे. त्यावर कठोर कारवाई व नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.





