Pimpri: पवनानगर-कामशेत मार्ग बनला सुखकर

पवनानगर : पवन मावळातील नागरिकांसाठी वाहतुकीचा प्रमुख मार्ग असलेल्या कामशेत – पवनानगर मार्गावर काही ठिकाणी जीवघेणे खड्डे असल्याचे वृत्त दै. प्रभातमध्ये दिनांक २३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.
‘पवनानगर-कामशेत मार्गावरील खड्डे जैसे थे! सार्वजनिक विभागाचे दुर्लक्ष’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभाग जागे झाले असून विभागाने तातडीने कार्यवाही करीत सदर मार्गावरील मोठमोठे खड्डे बुझविले आहेत. यामुळे प्रवासी नागरिक, वाहन चालक यांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी सामान्यांच्या प्रश्नांची योग्य दखल घेतल्याबद्दल दै. प्रभातचे आभार मानले आहेत.
कामशेत-पवनानगर मार्गावर पावसाळ्यापासून अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. काही खड्डे तर वाहनांचे चाक अडकेल इतके मोठे होते, तर काही खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण हुकत होते. पावसाळा संपून चार महिने उलटले तरीही खड्ड्यांची स्थिती जैसे थे होती, किंबहुना ते अधिक मोठे झाले होते. यामुळे नित्यनेमाने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, कामगार, विद्यार्थी, वाहन चालक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होतो. दै. प्रभातमध्ये याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यावरील पट्टी दूर झाली आणि विभागाने मार्गावरी खड्डे तातडीने बुजविले.
सध्या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजविले असून उर्वरित लहान खड्डेही लवकर भरून रस्ता खड्डामुक्त होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर सामान्यांचा प्रवास सुखकर करण्यास योग्य प्रकारे मदत केल्याबद्दल नागरिकांनी व पर्यटकांनी दै. प्रभातचे आभार मानले आहेत.





