Pimpri : अधिकार्यांनो, वेळेवर उपस्थित रहा; पत्रकारांना मात्र मनाई

पिंपरी : प्रशासकीय राजवटीत जनसंवाद सभेच्या नियोजनाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने दै. प्रभातमध्ये मंगळवार दि. 11 फेब्रुवारीला ‘महापालिका जनसंवाद सभा ठरतेय औपचारिकता’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर आयुक्तांनी सर्व संबंधित अधिकार्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आयोजनात अनेक बदलदेखील सुचविले आहेत. परंतु सोबतच पत्रकारांना जनसंवाद सभेत उपस्िथत राहण्यास मनाई करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे महापालिका नागरिकांच्या तक्रारी देखील लपविण्याचा प्रयत्न करत आहे का ?असा प्रश्न उपस्िथत होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीला तीन वर्षे पूर्ण झाली असून, नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी महापालिका प्रशासनाने जनसंवाद सभेचे आयोजन केले जात आहे. मात्र, या सभेच्या आयोजनाबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असून, याबाबत नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. तर नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण केले जात नसल्यानेदेखील या सभेबाबत नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. दै. प्रभातच्या वृत्ताने नागरिकांची व्यथा मांडली होती. याची दखल घेत, आयुक़्त शेखर सिंह यांनी या सभेच्या आयोजनाबाबत अनेक सूचनादेखील केल्या आहेत.
या सभेत समस्या मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून अर्जावर तक्रार लिहून घ्यावी. वैयक्तिकरित्या तक्रारदाराला सभेच्या ठिकाणी न बोलविता अन्य उपस्थित नागरिकांदेखील सभागृहात बोलवावे. प्रत्येक नागरिकाला तक्रार मांडण्यासाठी वेळ निश्चित करावी. तसेच एक तक्रार समजून घेतल्याशिवाय दुसर्या नागरिकांची तक्रार घेऊ नये. तक्रारदार नागरिकांचे नाव गुप्त ठेवावे. या सभेला एक महिला व एक पुरुष सुरक्षा रक्षकाची उपस्थिती असावी. या सभेतील तक्रारींचा अहवाल तयार करावा. या अहवालातील तक्रारींचे मुद्दे, चर्चेतील बाबी, प्रशासनाची उत्तरे व भविष्यातील योजना नोंदवाव्यात. ही संबा संपल्यानंतर नागरिकांचा अभिप्राय घ्यावा.
जनसंवाद सभेला पत्रकारांना उपस्थित राहण्यास मनाई
जनसंवाद सभेला पत्रकारांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. या सभेची मुख्य समन्वय अधिकार्याने पत्रकारांना माहिती द्यावी, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत. जिथे नागरिक त्यांच्या समस्या मांडतात तिथे पत्रकारांना मनाई करण्यात आल्याने महापालिका नागरिकांच्या तक्रारी आणि त्याला अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर हे देखील लपविण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न उपस्िथत होत आहे.





