Pimpri News | दिव्यांग डब्यात सुदृढ प्रवाशांचा कब्जा ; दिव्यांगासाठी राखीव जागेत अनधिकृत घुसखोरी

प्रभात वृत्तसेवा
चिंचवडगाव – पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर दररोज लोकल प्रवास करतात. मात्र, मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डब्यांमध्ये सुदृढ प्रवाशांच्या अनधिकृत घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. पुणे-लोणावळा लोकल ट्रेनमधील दिव्यांग प्रवाशाने याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच रेल्वे प्रशासनाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.पुणे रेल्वे स्थानकातून लोणावळाकडे निघालेल्या लोकलमध्ये दिव्यांगांसाठी राखीव डब्यात अनेक सुदृढ प्रवासी महिलांसह पुरुषदेखील प्रवास करत असल्याचे उघड झाले.
गर्दीच्या वेळी नियमांची पायमल्ली करत कोणताही प्रवासी कुठल्याही डब्यात शिरतो, यामुळे दिव्यांग प्रवाशांना चढताना व उतरतानाही अडथळे निर्माण होत आहेत.मी एका पायाने अपंग असल्याने डब्यात चढण्यासाठी मला वेळ लागतो. पूर्वी काही अडचण नव्हती, पण आता गर्दी इतकी वाढली आहे की राखीव डब्यातसुद्धा उभे राहण्यासाठी जागा मिळत नाही. अशा परिस्थितीत आमच्यासाठी असलेली आसनव्यवस्था आणि व्हीलचेअरची जागा देखील अडवली जाते, अशी व्यथा एका दिव्यांग प्रवाशाने मांडली.
राखीव डब्याचे नियम..
रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास राखीव डबे असतात. या डब्यांमध्ये फक्त शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा संवेदनाक्षम कमजोरी असलेले दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकच प्रवास करू शकतात. तसेच दिव्यांगत्व सिद्ध करणारे ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे.
दिव्यांग प्रवाशांची मागणी..
पिंपरी-चिंचवडमधून लोकलने प्रवास करणारे नागरिक, विशेषतः दिव्यांग प्रवासी, रेल्वे प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी करत आहेत. दिव्यांग डब्यांमध्ये सुदृढ प्रवाशांना चढू देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी दिव्यांग प्रवाशांनी केली आहे.





