Pimpri News | इस्काॅन मंदिरात दोन दिवस रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा सोहळा

प्रभात वृत्तसेवा
रावेत – रावेतमधील इस्कॉन मंदिरात येत्या 15 व 16 ऑगस्टला भक्तिभाव, भजन-कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार आहे. दोन दिवस अखंड कृष्णनामाचा गजर, अलौकिक दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या सोहळ्यादरम्यान सकाळी साडेसातपासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ‘श्री’चे अखंड दर्शन खुले राहील. दोन्ही दिवशी सायंकाळी सहा ते मध्यरात्र पर्यंत भजन-कीर्तन, संस्कृतीचा संगम घडवणारे कार्यक्रम आणि महाअभिषेक पार पडतील.
जन्माष्टमीच्या रात्री नेमक्या बारा वाजता भगवान श्रीकृष्णाची महाआरती होणार आहे, ज्याची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. उत्सवाला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग, तसेच राज्य आदिवासी विकास महामंडळाचे आयुक्त राजेंद्र भारुड यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष जगदीश गौरांग दास यांनी दिली. भाविकांनी पोलिस व मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, वाहतूक कोंडी टाळावी आणि नवजात शिशू व आजारी व्यक्तींना मंदिरात आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.





