Pimpri News | अग्निशामक जवानांना आधुनिक साधनांचे प्रशिक्षण

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशामक विभागात नव्याने नियुक्त झालेल्या अग्निशामक जवानांसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश नवोदित जवानांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि उपकरणांची ओळख करून देणे, आपत्कालीन परिस्थितीत शिस्तबद्ध आणि जलद प्रतिसाद देण्याचे कौशल्य विकसित करणे, तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे उपकरणांचा परिणामकारक वापर शिकवणे हा होता.
या प्रशिक्षण सत्रादरम्यान जवानांना फायर होजचा योग्य वापर व त्यासंबंधित तांत्रिक माहिती, पाणी व फोम टेंडरची सुरक्षित आणि कार्यक्षम हाताळणी, विविध प्रकारच्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रांचा वापर, संघभावना, नेतृत्वगुण आणि आपत्कालीन निर्णयक्षमता यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच अत्याधुनिक अग्निशमन साधनांच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून त्यांच्या कार्यपद्धती व वापराबाबत जवानांना मार्गदर्शन करण्यात आले.
त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा दाब आणि प्रमाण नियंत्रित करण्यासाठी सिलेक्टेबल गॅलॉन नोझल, झटपट दाब नियंत्रित करण्यासाठी सिलेक्टेबल गॅलॉन ट्रिगर कंट्रोल नोझल, कमी दाबातही कार्यक्षमतेने पाणी फवारण्यासाठी सिलेक्टेबल गॅलॉन फोर्स लो प्रेशर नोझल, विविध प्रकारच्या आगींवर कार्य करण्यासाठी मल्टिपर्पज नोझल, फोम तयार करून रासायनिक वा द्रव पदार्थांच्या आगी विझविण्यासाठी सेल्फ-एड्युसिंग सिलेक्टेबल गॅलॉन नोझल,
जास्त उष्णता असलेल्या जागी पाण्याची धुकी करून वातावरण थंड ठेवण्यासाठी व आग नियंत्रित करण्यासाठी मल्टिपर्पज थ्री-डी वॉटर मिस्ट, भिंत वा अडथळा फोडून आतील भागातील आग विझवण्यासाठी पिअरसिंग अप्लिकेशन नोझल, उच्च दाबाने पाणी सोडून मोठ्या प्रमाणावर आग आटोक्यात आणण्यासाठी हाय-प्रेशर डिस्चार्ज नोझल, जमिनीवरूनच दूर असलेली आग विझवण्यास मदत करणारे पोर्टेबल ऑसिलेटिंग मॉनिटर, अडकलेले दरवाजे, खिडक्या वा अडथळे फोडण्यासाठी इम्पॅक्ट टूल सेट, जवानांचे संरक्षण करण्यासाठी हॉलीगन टूल
तसेच कट अँड इम्पॅक्ट रेसिस्टन्स ग्लोव्ह्स इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आले.नवीन भरती झालेल्या जवानांनी या प्रशिक्षण सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. जवानांनी प्रत्यक्ष अनुभवातून मौल्यवान ज्ञान आत्मसात केल्याचे सांगितले. विशेषतः आधुनिक नोजल्स, रिमोट कंट्रोल मॉनिटर आणि रेस्क्यू टूल्सच्या प्रात्यक्षिकांचा अनुभव फार उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.





