pimpri news : …तर सोसायटी फेडरेशन उतरविणार उमेदवार

चिखली : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये जर राजकीय पक्षांनी सुयोग्य, चारित्र्यसंपन्न आणि गुणवत्तापूर्ण उमेदवार दिले नाहीत, तर आमचे स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवू, असा ठराव चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
ही बैठक बोऱ्हाडेवाडी येथील ऐश्वर्यम बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. बैठकीस मोठ्या संख्येने सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या कारभारात सोसायटीधारकांचा थेट आणि प्रभावी सहभाग असावा, ही भावना यावेळी ठळकपणे मांडण्यात आली.
बैठकीत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशियातील आघाडीची महानगरपालिका असूनही उपलब्ध आर्थिक स्रोतांचा प्रभावी वापर होत नाही. निर्णयप्रक्रियेत सोसायटीधारकांचा सहभाग अत्यल्प असून, त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नाही.
पुढील काही आठवड्यांत चिखली, मोशी, चऱ्होली व परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये संवाद दौऱ्यांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच शहर नियोजन, मूलभूत सोयीसुविधा आणि धोरणनिर्धारण प्रक्रियेत सोसायटी प्रतिनिधींना स्थान मिळावे, अशी मागणी उपस्थितांनी केली. चर्चांनंतर, फेडरेशनने स्वतःचे उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली असून, शहर विकासात सोसायटीधारकांची सक्रीय भूमिका सुनिश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रसंगी, फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी, आमची संस्था अराजकीय असली तरी शहराच्या विकासात आमच्या सदस्यांचा ९० टक्के वाटा आहे. नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी संवाद दौरे आयोजित करण्यात येतील. त्या मतांवर आधारित अंतिम निर्णय घेऊनच आम्ही निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.





