Pimpri News | महापालिकेच्या वतीने शिक्षकांचा गौरव ; २३ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – महापालिकेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून २३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त विशेष कामगिरीबद्दल महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा समावेश होता. यामध्ये क्रीडा शिक्षक भाऊसाहेब व्यंकट खैरे, पीसीएमसी पब्लिक स्कूल जाधववाडी कन्या प्राथमिकचे जितेंद्र कराड आणि आबासाहेब पाळवंदे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. तर, थेरगाव येथील बालवाडी विभागातील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेच्या सविता मांडेकर, यशवंतराव चव्हाण उर्दू शाळा थेरगावच्या नसरीन बानो मोहम्मद सुलतान आणि सावित्रीबाई फुले शाळा मोशीच्या वैशाली साकोरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.
प्राथमिक शाळांमधून मोशी मुले येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या प्रियंका गावडे, शुभांगी भोंडवे, दिघी कन्या पब्लिक स्कूलचे प्रदीप घुटे, भोसरी कन्या पब्लिक स्कूलच्या स्वाती शिंदे, मोशी कन्या पब्लिक स्कूलच्या कांचन घोडे, चिखली कन्या पब्लिक स्कूलच्या विश्वलता मोरे, कुदळवाडी पब्लिक स्कूलचे मारुती खामकर, पिंपळे गुरव पब्लिक स्कूलच्या चित्रा शेवकरी आणि थेरगाव उर्दू पब्लिक स्कूलच्या उस्ताद बिबिहाज्रा जंगबहादूर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
माध्यमिक शाळांमधून पिंपळे गुरव येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या प्रिया नांगरे, पिंपळे सौदागर येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या वैशाली मामुल्वार, राजश्री कांबळे आणि क्षितिज शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.खासगी शाळांमधून निगडी येथील विलू पूनावाला प्राथमिक शाळेच्या मनिषा कदम आणि श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज, चिंचवडच्या अंजू सोनावणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला.
तसेच, पिंपरी चिंचवड महापालिका संचालित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल व ज्युनियर कॉलेजचे सखाराम पितळे आणि काळेवाडी येथील आकांक्षा संचालित कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळेच्या मेघा कानडे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.चारोशीला फुगे यांनी सूत्रसंचालन केले, तर गणेश लिंगडे यांनी आभार मानले.





