Pimpri News | अनुदानाशिवायचा आदर्श! जयगड सोसायटीने उभारला देशातील मोठा सौर ऊर्जेचा प्रकल्प

प्रभात वृत्तसेवा
चिखली – पिंपरी चिंचवडमधील जयगड सोसायटी (पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पीएमआरडीएने उभारलेला प्रकल्प ) यांच्या इमारतीवर दोन वर्षात ३० kW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सोसायटीच्या स्वत:च्या खर्चातून विनाअनुदान तत्वावर यशस्वीपणे उभारण्यात आला. याचा लोकार्पण सोहळा आज आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली – मोशी, पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशन यांनी सांभाळले.
लोकार्पणाच्या प्रसंगी सोसायटीमधील संचालक मंडळ व सर्व सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते, त्यानी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले हा ३० किलोवॅट सौर ऊर्जेचा प्रकल्प म्हणजे सोसायटीला स्वच्छ, हरित आणि दीर्घकाल टिकणारी ऊर्जा उपलब्ध करून देईल. यामुळे ऊर्जा खर्चात मोठी बचत होईल, तसेच कार्बन उत्सर्जनातही घट होईल.शिवाय या पायरीने सोसायटीने ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होण्याच्या दिशे गतिमान पाऊल उचलले आहे.असे गौरवोद्गार संजीवन सांगळे यांनी काढले.
या उपक्रमामुळे पिंपरी–चिंचवडमधील सोसायट्यांमध्ये हरित प्रकल्पांसाठी नवीन प्रातिनिधिक उदाहरण तयार झाले आहे. जयगड सोसायटीने स्वावलंबन, पर्यावरण सुरक्षा आणि समाजिक एकरूपतेच्या दृष्टिने एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटी सचिव सोमेश्वर त्रिंबके यांनी केले तर मान्यवरांचे आभार अध्यक्ष हर्षद पाटील यांनी मानले.
“पर्यावरणासाठी पूरक असे सौरऊर्जा प्रकल्प हे प्रत्येक सोसायटीमध्ये बसवले गेले पाहिजेत जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल, त्याचप्रमाणे निसर्गाने आपणा सर्वांना दिलेली नैसर्गिक ऊर्जा याचा वापर करून पैशाची बचत होऊन सोसायटीच्या देखभाल खर्चात देखील बचत होईल. त्यामुळे फेडरेशन मार्फत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटीधारकांना आवाहन आहे की, आपण आपल्या प्रत्येक सोसायटीमध्ये सौरऊर्जा प्रकल्प ही संकल्पना राबवावी.”
– संजीवन सांगळे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन





