Pimpri News: ‘आंद्रा जॅकवेल’ प्रकल्पाच्या जागेला अखेर मंजुरी!
Pimpri News: महापालिकेला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने मिळणार जागा; सबस्टेशनसह अतिरिक्त पाण्याचा मार्ग मोकळा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आंद्रा धरण जॅकवेल प्रकल्पातील जागेचा अडथळा अखेर दूर झाला आहे.
या जागेचे सन २०२६-२७ च्या रेडीरेकनर दरानुसार २ कोटी २२ लाख ५५ हजार ५०० रुपये मूल्यांकन करण्यात आले असून, महापालिकेला ही भाडेपट्ट्याची रक्कम एकरकमी भरावी लागणार आहे. जागेला मंजुरी मिळाल्यामुळे महापालिकेला आता जॅकवेलसह संबंधित कामांची निविदा प्रक्रिया पुढे नेता येणार आहे, अशी माहिती चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे.
कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी भाडेपट्ट्याची रक्कम भरणे आणि जागा ताब्यात घेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे महापालिकेला बंधनकारक राहणार असून त्यानंतरच जॅकवेल, ॲप्रोच चॅनेल, पंप हाऊस, ॲप्रोच ब्रिज आणि सबस्टेशन उभारण्याच्या कामाला गती देता येणार आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला होता.
मावळ तालुक्यातील मौजे शिरे येथील जलसंपदा विभागाची ०.९५५ हेक्टर (९५ गुंठे) जागा महापालिकेला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड शहराला मंजूर असलेले अतिरिक्त आणि अधिक शुद्ध पाणी थेट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रकल्पातील अडथळा दूर
शहराच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी आंद्रा धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, धरणाजवळ जॅकवेल, ॲप्रोच चॅनेल, पंप हाऊस, ॲप्रोच ब्रिज आणि सबस्टेशन उभारण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष काम रखडले होते.
या गंभीर प्रश्नावर आमदार जगताप यांनी विधानसभेत आवाज उठवला. जलसंपदा मंत्री, वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महापालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने मौजे शिरे (गट क्र. ३८) येथील जागेचा प्रस्ताव मंजूर केला.
सध्या आंद्रा धरणाचे पाणी नदीपात्रातून उचलले जात असल्याने पावसाळ्यात गढूळपणा आणि नदीतील प्रदूषणाचा फटका बसतो. आता जॅकवेल उभारल्यानंतर बंदिस्त जलवाहिनीद्वारे थेट शुद्ध पाणी शहराच्या जलशुद्धीकरण यंत्रणेपर्यंत आणणे शक्य होणार आहे.
जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने जॅकवेल प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळणार असून, पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील पाण्याची गरज पूर्ण करण्याच्या दिशेने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे असे आमदार शंकर जगताप म्हणाले.
Pune District : भाजपा आळंदी शहर मंडलाचा ‘सेवा यज्ञ महा रक्तदान संकल्प’





