Pimpri News | शंभर रुपयांत वाळू, विसर्जनासाठी स्कॅनर ; विसर्जन घाट की बिझनेस पॉईंट?

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शहरातील विविध विसर्जन घाटांवर गणेश विसर्जनाच्या निमित्ताने भाविकांकडून बेकायदेशीररीत्या पैशांची मागणी सुरू असल्याचे समोर आले होते. या संदर्भात दै. प्रभातने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत पिंपरी चिंचवड महापालिकेने सर्व घाटांवर फलक लावून भाविकांना “विसर्जनासाठी कोणालाही पैसे देऊ नका” असे आवाहन केले होते. तसेच, पैशांची मागणी झाल्यास त्वरित महापालिकेशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली होती.
मात्र या आवाहनानंतरही पैशांची वसुली सुरुच असल्याचे वास्तव समोर आले आहे.चिंचवड येथील महापालिकेच्या गावडे जलतरण केंद्रासमोरील विसर्जन घाटावर तसेच जिजाऊ पर्यटन केंद्राजवळील विसर्जन घाटावर महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे कर्मचारीच विसर्जनासाठी पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले. भाविकांकडून ही तक्रार मिळाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली.
दरम्यान, थेरगाव येथील विसर्जन घाटावरही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी रात्री एका खासगी व्यक्तीने भाविकांकडून पैसे घेण्यासाठी स्कॅनर लावला होता. याशिवाय शनिवारी याच घाटावर एक व्यक्ती विसर्जनानंतर वाळू देण्यासाठी भाविकांकडून शंभर रुपयांची मागणी करताना आढळला. तपासात हे दोन्हीही व्यक्ती महापालिकेचे किंवा ठेकेदारांनी नियुक्त केलेले कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेला कारवाईची मागणी..
विसर्जन घाटांवर होत असलेल्या या बेकायदेशीर पैशांच्या मागणीनंतर भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





