Pimpri News: पालिकेच्या तिजोरीत ५५६ कोटींची भर; चार लाखांहून अधिक मिळकतधारकांचा कर भरणा
Pimpri News: डिजिटल माध्यमातून ५१२ कोटी जमा

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ४ ऑगस्ट २०२६ (दुपारी १२ वाजेपर्यंत) या कालावधीत ५५६ कोटी ८४ लाख ३४ हजार ७२९ रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे.
कर संकलन विभागाच्या विविध सवलत योजनांना मिळकतधारकांनी चांगला प्रतिसाद दिला असून अद्यापपर्यंत ज्या मिळकतधारकांनी मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तो विलंब न करता भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
यंदा कर भरण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन सुविधेला मोठी पसंती दिली आहे. महापालिकेच्या ५५६ कोटीचा मालमत्ता कर वसूल झाला असून, त्यापैकी ५१२ कोटी ७७ लाख ९८ हजार ७०८ रुपये ऑनलाइन माध्यमातून, तर ४४ कोटी ६ लाख ३६ हजार २१ रुपये ऑफलाइन माध्यमातून जमा झाले आहेत.
ऑफलाइन वसुलीत रोखीद्वारे २३ कोटी ८५ लाख ७० हजार १२२ रुपये, धनादेशाद्वारे १८ कोटी ४३ लाख ६७ हजार ५७२ रुपये आणि डिमांड ड्राफ्टद्वारे १ कोटी ७६ लाख ९८ हजार ३२७ रुपये जमा झाले आहेत.
शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या तसेच मोकळ्या जागांसह ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सर्व मालमत्ताधारकांना वेळेत कर देयके उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले होते. त्याला यश आले असून आतापर्यंत ५५६ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.
महापालिकेच्या विकासकामांना आर्थिक बळ देण्यासाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा महसुलाचा स्रोत आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून विकास प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे, ही समाधानाची बाब आहे. ज्या मिळकतधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त
चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ४ ऑगस्टपर्यंत ५५६ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर संकलित झाला आहे. त्यापैकी ५१२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन माध्यमातून जमा झाली आहे. यावरून नागरिकांचा डिजिटल माध्यमावरील वाढता विश्वास दिसून येतो. ज्या मिळकतधारकांनी अद्याप कर भरला नाही, तो त्यांनी तात्काळ भरावा. – सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका





