Pimpri News | पुनर्वापर करा, गरजूंना आधार द्या ; जाणून घ्या महापालिकेच्या RRR सेंटरचा उपक्रमाविषयी

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने शहरात रिड्यूस – रियुज – रिसायकल सेंटर सुरू करण्यात आले आहेत. आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभागांत उभारण्यात आलेल्या या केंद्रांद्वारे नागरिकांकडून घरात पडून असलेल्या पण अजूनही वापरण्यायोग्य वस्तू संकलित करून त्या थेट गरजूंपर्यंत पोहचविल्या जात आहेत.
या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होत असून समाजातील गरजूंना उपयुक्त वस्तू उपलब्ध होत आहेत.महापालिकेच्या आर.आर.आर. सेंटरमध्ये संकलित साहित्याचे प्रथम वर्गीकरण केले जाते. त्यातील उपयुक्त वस्तू गरजूंना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, तर उर्वरित वस्तू रिसायकल प्रक्रियेद्वारे नव्याने उपयोगात आणल्या जातात. या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
या सेंटरमध्ये नागरिक शैक्षणिक साहित्य, कपडे, खेळणी व बालसाहित्य, घरगुती व दैनंदिन वापराचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक व इतर साहित्य तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या विविध वस्तू जमा करू शकतात. घरात तुम्ही वापरत नसलेल्या पण उपयुक्त असणाऱ्या वस्तू कचऱ्यात फेकून न देता जवळच्या आर.आर.आर. सेंटरवर जमा करा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रभागनिहाय आर.आर.आर सेंटर..
कापसे उद्यान मोरवाडी, आकुर्डी भाजी मंडई, संत तुकाराम महाराज गार्डन, श्रीधरनगर गार्डन, एसकेएफ कंपनी शेजारी थेरगाव, हेगडेवार पूल दर्शननगरी, धर्मराज चौक रावेत , ज्योतिबा उद्यान काळेवाडी, हेगडेवार क्रीडा संकुल अजमेरा, धावडे वस्ती भोसरी, संत शिरोमणी सावता महाराज उद्यान मोशी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल पिंपळे गुरव, लिनियर गार्डन कोकणे चौक पिंपळे सौदागर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान पिंपळे निलख, तानाजी कलाटे उद्यान वाकड, मोशी चौक, दिघी जकात नाका,
राजमात जिजाऊ उड्डाण पूल, भोसरी, वृंदावन चिखली, चिखली कार्यालय , भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान, रुपीनगर पोलिस चौकी, शनि मंदिर सेक्टर २१, थेरगाव हॉस्पिटल शेजारी, जगताप नगर, सुखनगरी, बिजलीनगर, पिंपरीगाव बस स्टॉप, पिंपरीगाव, आरोग्य कोठी रहाटणी गावठाण, छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई संत तुकाराम नगर, सितांगण गार्डन, कै.काळुराम जगताप तलाव , जुनी सांगवी भाजी मंडई.
“आर.आर.आर. सेंटरच्या माध्यमातून गरजूंना वस्तूंची मदत होत आहे. तसेच पुनर्वापर संस्कृती शहरात रुजण्यास आणि आपले शहर शाश्वत व पर्यावरणपूरक बनविण्यास हे सेंटर उपयुक्त ठरू शकतील.”
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका




