Pimpri News : ‘प्रभात’चा दणका! पिंपळे सौदागरमधील ‘त्या’ मृत्यूच्या सापळ्यावर अखेर बसले झाकण
Pimpri News : लहान मुले आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटला; बातमीची दखल घेत प्रशासनाकडून तातडीने नवीन झाकण बसवण्यात आले.

Pimpri News – पिंपळे सौदागर येथील दिव्या हायट्स सोसायटीसमोरील पदपथावर तुटलेल्या चेंबरच्या झाकणामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीवर अखेर पडदा पडला आहे. दैनिक ‘प्रभात’मध्ये या समस्येबाबत वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केली. या ठिकाणी चेंबरचे झाकण तुटून चेंबर उघडे पडले होते.
त्यामुळे ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रात्रीच्या वेळी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही बाब अधिकच धोकादायक ठरत होती. ही गंभीर बाब ‘प्रभात’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर संबंधित प्रशासनाने त्वरित हालचाली सुरू केल्या. उघड्या चेंबरवर नवीन झाकण बसविण्यात आले असून पदपथ पूर्णपणे सुरक्षित करण्यात आला आहे.
तसेच पदपथाजवळ साचलेला कचराही उचलण्यात आल्याने परिसर स्वच्छ व मोकळा झाला आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून “प्रभात”ने आवाज उठवल्यामुळेच समस्या मार्गी लागल्याची भावना व्यक्त केली. वाहनचालक व पादचारी यांनी दैनिक ‘प्रभात’ आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत. नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडून त्यावर तातडीने उपाययोजना व्हावी, यासाठी माध्यमांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.





