Pimpri News | पिंपरीत गणेशोत्सवाचं ‘राजकीय प्रायोजकत्व’ पुन्हा रंगात

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असल्याने यंदा नेते मंडळींनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून वर्गणी दिली आहे. मागील वर्षांच्या अनुभवाने यंदा काही मंडळांनी नेते मंडळींना टाळले होते. परंतु आता नेते स्वत:च फाेन करुन वर्गणी, इतर मदत देऊ करत आहेत. तसेच आरतीच्या वेळा ठरवित आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी जनसंपर्कावर विशेष भर दिला आहे. यात गणेशोत्सव हा सर्वांत महत्त्वाचा काळ ठरतो. प्रत्येक परिसरातील संपूर्ण तरुणाईला भेटण्याचा गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून विविध स्पर्धा आयोजित करुन पुरस्कार देण्यासाठी शेकडो मतदारांसमोर जाण्याची संधी साधण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रभागात डझनभर नेते करत आहेत.
सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारी लागले असतानाच सार्वजनिक गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात वर्गणी देत आहेत. कार्यक्रमांचे प्रायोजकत्व स्वीकारत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुका लांबल्याने नेत्यांनी हात आखडता घेतला होता. यामुळे मंडळांनी उत्सव साजरा करण्यासाठी वेगळे पर्याय निवडले होते.
मंडळांनी थेट बड्या व्यावसायिक आस्थापनांची आणि ब्रॅंडची जाहिरात करत नेत्यांवरील निर्भरता कमी केली होती. यामुळे अनेक मंडळांनी मागील दोन ते तीन वर्षे आपल्याकडे पाठ फिरविणाऱ्या नेत्यांकडे पाठ फिरवली. यामुळे नेत्यांनी थेट स्वत:च फोन करत आणि भेटीगाठी घेत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी सुरू केली आहे.
मागील वर्षी पर्यटन..
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे साडेतीन महिने प्रशासकीय राजवट सुरू असून आयुक्तच प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. गणेशाेत्सवात वर्गणीचे महत्त्व प्रचंड आहे. मागील तीन वर्ष नगरसेवक नसल्यामुळे विविध सण, उत्सवासाठी वर्गणी, देणगी देण्यासाठी राजकीय पुढा-यांनी हात आखडता घेतला हाेता.
मागील वर्षी काही नेत्यांनी थेट पर्यटन दौरे केले होते. परंतु रोष वाढल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्या जवळच्या कार्यकत्र्यांच्या माध्यमातून काही मंडळांना वर्गणी पोहचविली होती. मागील या आठवणी गणेशोत्सव मंडळांच्या सभासदांच्या अजूनही आठवणीत आहेत. यामुळे काही मंडळांनी थेट व्यावसायिक आधार घेतला आणि आता पुन्हा त्यांच्याकडे जायचे नाही असा निर्णय घेतला. परंतु आता नेतेच त्यांच्याकडे येत आहेत.
पुन्हा आधारस्तंभ, मार्गदर्शक..
काही नेत्यांना मोठ-मोठ्या वर्गण्या देत मंडळांच्या अहवालात ‘आधारस्तंभ, मार्गदर्शक, उगवते नेतृत्त्व, भावी नगरसेवक, लोकसेवक, जनसेवक अशा उपमा स्वत:ला देऊ केल्या आहेत. तर अनेक ठिकाणी मंडळांजवळ स्वखर्चाने फलकबाजी करत नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.





