Pimpri News | आता नवरात्राैत्सवातही ‘मतांचा जोगवा’ ; प्रभागातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी गाठीभेटी सुरू

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – उत्सव आणि सणांचे राजकीयीकरण झाल्याने गणेशोत्सवामध्ये इच्छुकांनी चांगलाच फायदा घेतला. आता प्रभागामध्ये गाठीभेटी घेण्यासाठी नवरात्राैत्सवाची प्रतीक्षा करत असून त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. मतांचा जोगवा मागण्याची योजना राजकीयांनी आखली आहे. महापालिकेची निवडणूक लवकर होऊ घातली असल्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी मतदारांकडे मतांची फिल्डिंग लावण्यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
गणेशोत्सवात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घेत बाप्पासमोर घसघशीत दक्षिणा टाकत मतांची पेरणी केली आहे.महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२२ साली होणे अपेक्षित होते. करोनामुळे निवडणूक पार पडली नाही. आता निवडणूक होणार असून, चारसदस्यीय प्रभाग रचना जाहीर झाली आहे. निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर नागरिकांच्या घरापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. उत्सव हा त्यासाठी एक चांगला मार्ग आहे. त्यामुळे यंदा दहीहंडीसह गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून त्यामध्येही इच्छुक, माजी नगरसेवक गाठीभेटींवर भर देणार आहेत. त्यामाध्यमातून जनसंपर्क वाढत आहे.
तसेच नवरात्रोत्सवामध्ये प्रभागामध्ये गरबा, नृत्य व विविध कार्यक्रम घेण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मंडळांचे अध्यक्ष, सदस्य यांच्यासोबत बैठका सुरू झाल्या आहेत. मंडळाला चांगली देणगी देत मंडळाच्या चौफेर फ्लेक्सबाजी करण्यासाठी इच्छुक साकडे घालत आहेत. तसेच काही इच्छुकांचे स्वतःचेच मंडळ असल्याने मोठे कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवात देखील राजकीय मंडळींचा आवाज असणार आहे. या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचत मतांचा जोगवा मागितला जाणार आहे.
जो वर्गणी देतो त्याचा बॅनर लावला जातो..
महापालिका हद्दीतील नेते आणि आमदार – खासदारांकडून प्रत्येक सार्वजनिक मंडळांना गणपतीची वर्गणी दिली जाते. ज्या माजी नगरसेवक, खासदार, आमदारांने वर्गणी दिली, त्याचा गणेश भक्तांना शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यात आला होता. तोच फंडा नवरात्रोत्सवात देखील वापरला जाणार आहे. मंडळाची भव्यता, मंडळ किती वर्षे जुने आहे. त्यानुसार मंडळाची वर्गणी ठरते.
आमच्यावर लक्ष असू द्या..
आम्ही प्रत्येक वेळी तुमच्या मदतीला धावून येतो. आत्ता आमच्यावर लक्ष असू द्या, असे गणपतीचे दर्शन घेऊन निघताना राजकीय मंडळी आवर्जून सांगत होते. दर्शन हे निमित्तमात्र होते. मात्र, मतदारांशी संवाद साधून नेमका त्यांचा काय कल आहे याची चाचपणी करत होते. तशीच चाचपणी करण्याची संधी आता नवरात्रोत्सवात देखील असणार आहे.
मतदाराचे दोन घास गोड..
घरगुती बाप्पांच्या देवदर्शनाला सकाळीच सुरूवात होत होती. त्यानंतर हा देवदर्शनाचा कार्यक्रम रात्री एक वाजेपर्यंत सुरू असायचा त्याचे नियोजन लोकप्रतिनिधी यांचे स्वीय सहाय्यक करत. प्रत्येक घरामध्ये लोकप्रतिनिधीचे स्वागत आनंदाने केले जायचे. आलेल्या मंडळींना मोदक आणि फळांचा प्रसाद दिला जातो. ते दोन घास इच्छुक आनंदाने खायचे.





