Pimpri News : महापालिकेचा हास्यास्पद दावा! शहरात खड्डेच खड्डे, तरीही पालिका म्हणते ५८२ च बाकी..वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. त्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली असून वाहनचालकांना खड्डे चुकवून मार्गक्रमण करावे लागत आहे. तसेच धूळही वाढली आहे. दुसरीकडे शहरात फक्त ५८२ खड्डे असल्याचा हास्यास्पद दावा महापालिका प्रशासनाचा आहे. पावसाने आता विश्रांती घेतल्यामुळे त्वरीत खड्डे बुजविण्यात येतील. दिवाळीपूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश दिल्याचे महापालिकेचे सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यावर्षी जाेरदार पाऊस झाल्याने शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्डेमय रस्त्यांवरून अत्यंत संथ गतीने वाहने पुढे सरकत आहेत. दुचाकीस्वारांना खड्डेमय रस्त्यांवरून पुढे जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पदपथांवर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणच्या पदपथांवर बसविलेले पेव्हर ब्लॉक डळमळीत झाले आहेत.
त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांवर चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडलेले दिसून येत आहेत.यंदा पावसाला मे महिन्यातच सुरूवात झाली आहे. त्यामुळे विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शहरात १२ फुटांपासून ८० फूट रुंदीचे रस्ते आहेत. पक्के, कच्चे असे २ हजार ७३ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. डांबरी, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत.
साडेचार महिन्यात या रस्त्यांवर ४ हजार ६५ खड्डे आढळले आहेत. त्यापैकी महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने १ हजार ४२४, बीबीएमने ३१३, खडीने १ हजार २०३, पेव्हिंग ब्लॉकने २७५, सिमेंट काँक्रिटने ४८१ असे ३ हजार ६९६ खड्डे पूर्णतः बुजविले आहेत. त्याचे प्रमाण ८६.४० टक्के आहे. शहरातील केवळ ५८२ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील विविध भागातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच-खड्डे दिसून येत आहेत.
“शहरात पडलेल्या पावसाने विविध भागातील रस्त्यावर साडेचार महिन्यांत ४ हजार ६५ खड्डे पडले आहेत. त्यापैकी ३ हजार ६९६ खड्डे बुजविले असून ५८२ खड्डे बुजविणे बाकी आहे. पावसाने विश्रांती दिल्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. तसेच दिवाळीपूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविले जातील.”
– देवन्ना गट्टूवार, सह शहर अभियंता, महापालिका.





