Pimpri News: महापालिका आयुक्तांची उधळपट्टी चर्चेत; अलिशान वाहनानंतर आता कार्यालयावर खर्च
Pimpri News : अलिशान वाहने खरेदी केल्यानंतर आता आयुक्तांनी स्वतःच्या कार्यालयाचे सुशोभीकरण हाती घेतले

Pimpri News: पिंपरी चिंचवड महापालिकेचे उत्पन्न घटत आहे. तिजोरीत खडखडाट असून पाण्याच्या प्रकल्पासाठी ठेवी मोडण्याची वेळ आली आहे. असे असताना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची उधळपट्टी चर्चेत आली आहे.
आयुक्त व महापौर यांनी अलिशान वाहने खरेदी केल्यानंतर आता आयुक्तांनी स्वतःच्या कार्यालयाचे सुशोभीकरण हाती घेतले आहे. त्यावर लाखो रुपयांचा खर्च होणार आहे.
चार वर्ष महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. या काळात मोठ्या प्रमाणावर अनावश्यक प्रकल्प व सल्लागारांवर खर्च करण्यात आला. परिणामी, श्रीमंत असलेल्या महापालिकेची अवस्था दयनीय झाली. असे असताना जानेवारी महिन्यामध्ये महापालिकेची निवडणूक होऊन नगरसेवक पालिकेत आले.
निवडणुका झाल्यानंतर देखील सत्ताधाऱ्यांनी उधळपट्टीत कमी ठेवली नाही. याला आयुक्तांनी ब्रेक लावण्याची आवश्यकता असताना महापालिका आयुक्तच सत्ताधाऱ्यांसोबत उधळपट्टी करताना दिसत आहेत.
मागील आठवड्यातच महापौर आणि आयुक्तांसाठी नियम डावलत वाहनांची खरेदी करण्यात आली. ही वाहन खरेदी करताना वाहन खरेदी रक्कमेच्या मर्यादेचे पालन करण्यात आले नाही.
तर, आता महापालिका आयुक्तांनी महापालिकेतील चौथ्या मजल्यावरील त्यांच्या कार्यालयाचे सुशोभीकरण सुरू केले आहे. सुस्थितीत असलेल्या या कार्यालयाचे कोणेतही सुशोभीकरण करण्याची गरज नव्हती. मात्र, असे असतानाही गेल्या एक आठवड्यापासून कार्यालयाचे काम चालू आहे.
त्यामुळे आयुक्त महापालिकेत न बसता ऑटो क्लस्टर येथे असतात. याबाबत नागरिकांना देखील कोणतीही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे आयुक्तांच्या भेटीसाठी नागरिक महापालिकेत चौथ्या मजल्यावर गर्दी करतात. मात्र, आयुक्त उपस्थित नसल्याने सुरक्षारक्षक व नागरिकांमध्ये वाद होतो.
मात्र, पालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना अशा प्रकारे उधळपट्टी करणे योग्य नसल्याचा सूर नागरिकांमधून येत आहे.





