pimpri news :अग्निशमन विभागातर्फे मॉकड्रिल

सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात गॅस लिकेज आणि बचावकार्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक
; कर्मचारी आणि नागरिकांना आपत्कालीन तयारीचे मार्गदर्शन
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चऱ्होली उपअग्निशमन केंद्रामार्फत सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) येथे गॅस लिकेज, स्वतःचा आणि इतरांचा बचाव, आग आणि आगीचे प्रकार तसेच आग विझविण्याच्या पद्धतींवर आधारित मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचारी व नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन केले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या अधिपत्याखाली उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आणि प्रभारी उपअग्निशमन अधिकारी विकास नाईक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन विभागाचे जवान, सांडपाणी शुद्धीकरण केंद्राचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते.
गॅस लिकेज झाल्यास काय उपाययोजना कराव्यात, परिसर तात्काळ रिकामा करण्याचे महत्त्व, अग्निशमन साधनांचा वापर करून आग लागल्यास तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी काय करावे, तसेच स्वतःचा आणि इतरांचा जीवितहानीपासून बचाव कसा करावा, याबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. अग्निशमन दलातील जवानांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे गॅस लिकेज ओळखण्याची चिन्हे, लहान व मोठ्या आगींचे प्रकार आणि विविध अग्निशामक उपकरणांचा योग्य वापर कसा करावा, हे दाखवून दिले.
तसेच सांडपाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये कोणीही व्यक्ती किंवा प्राणी पडल्यास, त्या ठिकाणी असलेल्या विषारी वायूंपासून स्वतःचे आणि केंद्रामध्ये अडकलेल्या व्यक्ती अथवा प्राण्याचे रक्षण करून प्राथमिक स्तरावर बचावकार्य कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.





