Pimpri News | वारंगवाडीत बिबट्याचा थरार! दिवसभरात तिनदा दर्शन ; गावात भीतीचं वातावरण

प्रभात वृत्तसेवा
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे मंगळवारी सकाळपासून रात्रीपर्यंत (१६ सप्टेंबर) बिबट्याचा वावर आढळला. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याच्या या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मंगळवारी सकाळी सहा वाजता वारंगवाडी येथील शेतकरी सोमनाथ शिंदे म्हशीच्या धारा काढण्यासाठी गोठ्यात जात होते. ते प्रफुल्ल शिंदे यांच्या जुन्या पोल्ट्रीच्या रस्त्यावरून येताना त्यांना प्रथम बिबट्या दिसला. त्यानंतर सकाळी अकरा वाजता शेतकरी बबन वारिंगे हे जनावरे घेऊन शेतात गेले असता तिथे त्यांना बिबट्या दिसला.
बिबट्याने दोन ते तीन वेळेला डरकाळी फोडून जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या भीतीने बबन वारिंगे पळून गेले.मंगळवारी रात्री वारंगवाडी येथील संगमेश्वराच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्याला गावातील तरुणांनी पाहिले. अधिक शोध घेण्यासाठी दीपेश शिंदे, नितीन बबन वारींगे, विवेक मोरे यांनी कार मधून त्याचे फोटो शूटिंग केले. त्यावेळी संगमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तारा ऍग्रो फार्मच्या जुन्या पडिक गोठ्यात बिबट्या दिसला. कारच्या लाइटमुळे त्याने पलायन केले.
वडगाव मावळचे वनपाल एम एस हिरेमठ यांना ग्रामस्थांनी माहिती दिली. त्यानंतर रात्री उशिरा वनपाल एम एस हिरेमठ, वनरक्षक एस के मोरे, वनरक्षक वाय एस कोकाटे यांनी वारंगवाडी येथे भेट दिली.या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची पाहणी करून या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले. यावेळी तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना व मार्गदर्शन सर्व गावातील नागरिकांना करण्यात आले.
वन विभागाकडून बिबट्याबाबत जनजागृती..
वन विभागाकडून गुरुवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता संगमेश्वर मंदिरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बिबट्याबाबत काय खबरदारी घ्यावी, याबाबत वन विभाग आणि बावधन येथील रेस्क्यू टीम मार्गदर्शन करणार आहे. वारंगवाडी येथे केवळ एक बिबट्या नसून दोन बिबटे व एक बछडा असल्याचे सांगितले जात आहे.
“गावातील नागरिकांनी बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात जाऊ नये. बिबट्या असलेल्या परिसरात जाताना घुंगराची काठी, मोबाइल फोनचा आवाज करून जावे. शक्यतो घोळक्याने फिरावे. लहान मुलांना एकटे सोडू नये. तसेच पाळीव प्राण्यांना बाहेर न बांधता गोठ्यात बांधावे असे आवाहन करण्यात आले आहे.”
– प्रकाश शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव





